26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रउद्या मंत्रिमंडळ विस्तार?

उद्या मंत्रिमंडळ विस्तार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात भाजप व शिंदे गटाचे २४ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले असले तरी सरकारवर मात्र भाजपाचेच वर्चस्व राहणार असून, गृह, महसूल, अर्थ आदी महत्वाची खाती भाजपाकडे राहणार असल्याचे समजते. नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषी आदी खाती शिंदे गटाला मिळणार आहेत, असे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर उर्वरित मंत्रीमंडळाचा शपथविधी कधी याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गटनेत्याच्या नियुक्तीसह सरकार स्थापनेशी निगडित विविध बाबींसादर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, ११ जुलैला त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतरच विस्तार होईल, अशी चर्चा होती. परंतु तोवर थांबण्याची आवश्यकता नाही, शनिवारी पाहिला विस्तार होऊ शकेल, असे भाजपातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. दोन टप्प्यात हा विस्तार अपेक्षित असून दुसरा टप्पा पावसाळी अधिवेशनानंतर असेल असे समजते.

शिवसेनेच्या ५५ पैकी तब्बल ४० आमदारांना सोबत घेऊन आलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्रीपद दिले असले तरी सरकारवर भाजपाचाच प्रभाव असणार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ४३ जणांचे मंत्रिमंडळ होऊ शकते. यातील १३ मंत्रिपदे शिंदे गटाला दिली जाणार आहेत.

मलाईदार खाती भाजपकडे
गृहखाते उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असून, याशिवाय महसूल, जलसंपदा, अर्थ, ग्रामविकास, सहकार आदी खातीही भाजपाकडेच राहणार असल्याचे समजते. शिंदे यांनी महसूल खाते स्वत:कडे घेतले तर पूर्वी त्यांच्याकडे असलेले नगरविकास खाते भाजपाकडे जाऊ शकते.

यांची वर्णी लागण्याची शक्यता !
शिंदे गटाकडून मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, बच्चू कडू यांच्यासह दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय शिरसाट यांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर भाजपातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, योगेश सागर यांची नावं चर्चेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या