मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारतोफा शनिवार दि. २८ जानेवारी रोजी थंडावल्या आहेत.
शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी आज दिवसभर सभा, मेळावे आणि गाटीभेटींवर भर दिला. या निवडणुकीसाठी येत्या सोमवार दि. ३० जानेवारी मतदान होणार आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुदत होती. राज्यातील पाचही जागांची मुदत ७ फेब्रुवारी रोजी संपत आहे. तर या पाच जागांवर सध्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील अशी लढत होणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सध्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे डॉ. रणजित पाटील आणि काँग्रेसकडून धीरज लिंगाडे हे आमनेसामने आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे काळे विक्रम वसंतराव, भाजपकडून पाटील किरण नारायणराव हे दोघे महत्वाचे उमेदवार आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक भारतीचे धनाजी पाटील, शेकाप व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार बाळाराम पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. तर नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.