मुंबई : भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता बावनकुळेंच्या मागणीवर नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय अधिका-यांवर दबाव टाकून महाविकास आघाडी नेत्याने आपल्या सोयीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी केली आहे.
बंडखोरीनंतर राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात करत ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आलेले सर्व निर्णय रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा धडाका लावला आहे. त्यात आता प्रभाग रचना रद्द करण्याची मोठी मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या या मागणीनंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सत्ता स्थापनेपूर्वीच इतकी घाई कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर, दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी योग्य असल्याचे मत भाजपचे नेते राम कदम यांनी व्यक्त केले आहे.
प्रलंबित निवडणुका घेण्याचे ‘सर्वोच्च’ निर्देश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रभाग रचना तसेच आरक्षणासंदर्भामध्ये प्रक्रिया सुरू असून ती जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यातच आता भाजपने सर्व प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीनंतर मविआकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.