24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रवाशीतील प्रदर्शनात घडणार जगभरातील मांजरांचे दर्शन

वाशीतील प्रदर्शनात घडणार जगभरातील मांजरांचे दर्शन

एकमत ऑनलाईन

वाशी : घारे, निळे डोळे, झुबकेदार मिशा आणि लांब शेपटाच्या गुबगुबीत मांजराचे छोट्यांपासून मोठ्यांना देखील कायमच आकर्षण राहिलेले आहे. बाल्यावस्थेत आई आपल्याला जेवू घालताना जेव्हा काऊ-चिऊला साद घालायची तेव्हा या पक्ष्यांच्या जोडीलाच आपल्याला हवी असायची ती म्याऊ अर्थात मनी मांजर. मांजर हा तसा शांत, निरुपद्रवी आणि सर्वांचे आकर्षण असलेला प्राणी असल्यामुळेच बहुतेक घरांमध्ये मांजर लाडाने पाळलेले दिसते. वाघाची मावशी समजल्या जाणा-या याच मांजरांच्या जगभरात अनेकविध जाती आहेत. याच जगभरातील मांजरी एकाच छताखाली अवतरणार आहेत येत्या २२ मे रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको भवनमध्ये होऊ घातलेल्या ‘कॅट शो’ मध्ये. फिलाईन क्लब ऑफ इंडिया या प्राणीप्रेमी संस्थेच्या माध्यमातून आयोजित केला गेलेला हा भव्यदिव्य कॅट शो म्हणजे एका अर्थाने जगभरातील मार्जार प्रेमींसाठी एक आनंद पर्वणीच असणार आहे. जनमानसात मांजरांबद्दल, त्यांच्या आहाराबद्दल आणि संगोपनाबद्दल सुयोग्य माहिती पोहोचविणे हा या शो चा उद्देश आहे.

जगभरात मांजरांच्या एकूण ७८ प्रजाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये ४२ जातीच्या मांजरी आढळतात. याच भारतीय भटक्या जातीच्या मांजरांचे ‘इंडेमाऊ’ असे नामकरण फिलाईन संस्थेने केले असून अशा इंडेमाऊंचा देखील या प्रदर्शनात सहभाग असणार आहे . या प्रदर्शनाच्या निमित्ताने मांजरप्रेमींना पर्शियन, बंगाली, क्लासिक लाँग हेअर, एक्झॉटिक शॉर्ट हेअर, मेन कुण,अशा ३०० हून अधिक मांजरी पाहायला मिळणार आहेत . याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ३ परीक्षक देखील उपस्थित राहणार असून त्यांच्यासमोर देशभरातील मांजरप्रेमी आपल्या मांजरी सादर करणार आहेत.

अर्थात त्यासाठी प्रत्येक मांजराच्या पालकांना नोंदणीसाठी नाममात्र शुल्क भरावे लागणार आहे, अशी माहिती फिलाईन क्लबचे अध्यक्ष साकिब पठाण यांनी दिली.
वाशी येथे आयोजित या ‘कॅट शो’चे खास वैशिष्ट्य म्हणजे याच सोहळ्याच्या निमित्ताने फिलाईन क्लब आणि व्हिसकास यांच्या संयुक्त विद्यमाने मांजर दत्तक मोहीम देखील राबवली जाणार आहे. ज्या मांजरप्रेमींना ठराविक जातीच्या मांजरांना दत्तक घ्यायचे असेल त्यांची संस्थेच्या माध्यमातून कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक स्तरावर चौकशी करूनच त्यांना मांजर दत्तक दिले जाणार आहे. यासाठी मांजरांसाठी काम करणा-या विविध सामाजिक संस्था, प्राणीमित्र संघटना आणि कॅट फिडरस यांचे देखील योगदान असेल, असे मार्स केअरच्या संचालिका वसुधा झा म्हणाल्या.
मांजरांसाठी असलेले विविध

खाद्यपदार्थांचे स्टॉल, प्राण्यांशी निगडित विविध उत्पादने, जगभरातील प्राणीतज्ज्ञ आणि मांजरप्रेमी अशा अनेकांचा या शोमध्ये सहभाग असणार असून शालेय विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मोफत प्रवेश असेल. मांजरांचे आकर्षण असलेल्या प्रत्येकासाठीच हा ‘कॅट शो’ म्हणजे ख-या अर्थाने आनंदाची जत्रा असणार आहे हे नक्की.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या