मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील आमदारांवर दबाव टाकण्यासाठी फोन करत असल्याचे पटोले यांनी म्हटले.
याबाबत सगळी माहिती आमच्याकडे आहे. वेळ आली की ही माहिती समोर आणू, असे नाना पटोले यांनी सांगितले. भाजपने कितीही अडथळे निर्माण केले तरी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
याविषयी नाना पटोले म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर जनतेसमोर या गोष्टी मांडू. आमच्या हाती आलेल्या रेकॉर्डनुसार ईडी आणि सीबीआय यांचा दुरुपयोग कसा सुरू आहे हे निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला समजत आहे. भाजप सीबीआय आणि ईडीचा हत्यार म्हणून वापर करत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे.
यावर कोणती कायदेशीर कारवाई करणार का, असा सवाल विचारला असता नाना पटोले म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती मीडियासमोर येऊन न्याय मागत आहेत, यावरून काय परिस्थिती आहे याचा अंदाज येऊ शकतो. आम्ही जनतेच्या दरबारातच ही गोष्ट घेऊन जाऊ. हे लोक सत्तेचा कसा गैरवापर करतात हे त्यांच्यासमोर मांडू.