27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेच्या वाचाळवीरांना केंद्राचा लगाम!

शिवसेनेच्या वाचाळवीरांना केंद्राचा लगाम!

एकमत ऑनलाईन

राज्यात निमलष्करी दल तैनात करणार
नवी दिल्ली : शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिकांची संतप्त निदर्शने, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना पाहता मुंबईसह राज्यात निमलष्करी दलांना पाचारण करावे, या राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या मागणीला केंद्रीय गृहमंत्रालय सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या विचारात आहे.

साधारणत: बंडखोर आमदार मुंबईत परत येतील त्याच सुमारास महाराष्ट्रात अर्ध सैनिक दलाच्या तुकड्या तैनात करण्याच्या दृष्टीने गृहमंत्रालयाच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने भडक भाषणे करणा-या नेत्यांना योग्य रितीने ‘लगाम’ घालण्याचीही प्रक्रिया दिल्लीच्या पातळीवर सुरू झाली आहे.

गुवाहाटीमध्ये पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी असलेल्या ५० बंडखोर आमदारांनाही राज्यात, आपापल्या मतदारसंघात परतण्याचे वेध लागले आहेत. अनेक आमदारांनी तशी मागणी शिंदे यांच्याकडे केलीे. मात्र शिवसैनिकांच्या संतप्त आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या आमदारांचा जीव धोक्यात येईल असे पाऊल उचलण्यास भाजपचे नेतृत्व सध्या तयार नाही. दुसरीकडे यासंदर्भातील लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने न्यायालयीन सुनावणीची कारवाईही सुरू झाली आहे. त्यामुळे या आठवडाभरात हे आमदार मुंबईत परतु शकतात काय, या दृष्टीने भाजप नेतृत्वाने चाचपणी सुरू केली आहे.

राज्यपाल कोशियारी यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे आणखी एक पत्र केंद्रीय गृहसचिवांना लिहिले. त्यात त्यांनी संजय राऊत किंवा इतर शिवसेना नेत्यांचा नामोल्लेख केला नसला तरी काही नेत्यांकडून भडकाऊ आणि धमक्या देणारी भाषणे होत असल्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबियांबद्दल चिंता वाटते, असे गुवाहाटीतील शिवसेना, प्रहार जनशक्ति आणि अपक्ष मिळून ४८ आमदारांनी आपल्याला कळविले आहे, असे नमूद केले.

मंत्री किंवा आमदार म्हणून आपल्या परिवाराला मिळणारी सुरक्षा राज्य सरकारने बेकायदेशीररित्या मागे घेतल्याचीही तक्रार आमदारांनी केल्याचे यापूर्वीच्या पत्रातच स्पष्ट केले होते. आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ पोलीस सुरक्षा प्रदान करावी असे निर्देश आपण यापूर्वीच दिल्याचेही राज्यपालांनी पत्रात म्हटले. दरम्यान राज्यपाल कोशियारी यांच्या पत्राची केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्या पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे.

बंडखोर आमदारांविरुद्ध आक्रमक झालेले शिवसैनिक अनेक शहरांमध्ये तोडफोड करत आहेत व महाराष्ट्राचे पोलीस मूकदर्शक बनले आहे, असा गंभीर आरोप राज्यपालांनी केला आहे. त्यामुळेच हे आमदार जेव्हा प्रत्यक्ष मुंबईत परत येतील त्यावेळी त्यांच्या जिविताचे रक्षण व कायदा सुव्यवस्था परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, या दृष्टीने निमलष्करी दले मुंबई आणि राज्यात तैनात करण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. साधारणत: या आठवडाभरात याबाबत केंद्राकडून ठोस निर्णय गृहमंत्रालयाकडून प्रत्यक्ष अमलातही आणला जाणे शक्य आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या