पुणे : हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईसह राज्याच्या विविध भागात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंशांच्या खाली नोंदवले जात आहे. त्याचबरोबर किमान तापमानही २५ अंशांच्या आसपास नोंदवले जात आहे. अशा स्थितीत पुढील काही दिवसांसाठी आकाश ढगाळ तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या तरी उष्णतेपासून दिलासा कायम राहणार आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते मध्यम’ श्रेणीत नोंदवला जात आहे. मुंबईत आज (बुधवार) कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो. ३० मेपर्यंत ढगाळ वातावरण आणि मधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्यात कमाल तापमान ३७ तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण राहील. ३१मेपर्यंत असेच वातावरण राहील.