21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रचंद्रकांत पाटलांचे वक्तव्य म्हणजे पदाधिका-यांच्या मनातील भावना : आशिष शेलार

चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य म्हणजे पदाधिका-यांच्या मनातील भावना : आशिष शेलार

एकमत ऑनलाईन

मुंबई : चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केले ते तत्कालीन पदाधिका-यांच्या मनातील भावना आहेत. चंद्रकांत पाटील यांनी फक्त त्या भावना व्यक्त करण्याचे काम केले, त्यांचा तो निर्णय नाही, असे मत भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे. ‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले’ या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आता आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावरूनच आशिष शेलार यांनी चंद्रकांत पाटील यांनी पदाधिका-यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्याचे म्हटले आहे.

तत्कालीन पदाधिका-यांच्या मनातील भाव चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. त्यांचा तो निर्णय नाही. शिवाय बैठकीतील त्यांचे भाषण बाहेर कसे आले? हे पाहत आहोत, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, असे मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.

आशिष शेलार यांनी या बैठकीत संमत झालेल्या प्रस्तावांबाबतही माहिती दिली. राजकीय, कृषीविषयक आणि ओबीसी राजकीय आरक्षण हे तीन प्रस्ताव बैठकीत संमत झाले. राजकीय प्रस्ताव मांडताना गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अधोगतीवर चर्चा झाली. भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातील शिवसेनेने नवीन सरकार स्थापन केले. या सरकारचे अभिनंदन यावेळी करण्यात आले. याबरोबरच नेतृत्वाने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याच्या दिलेल्या आदेशाचे देवेंद्र फडणवीस यांनी पालन केले. त्यांच्या त्यागाबद्दल बैठकीत अभिनंदन केले, अशी माहिती शेलार यांनी दिली.

आशिष शेलार म्हणाले, इंधन दर कपात, ओबीसी आरक्षण, शेतक-यांना प्रोत्साहन असे वेगवेगळे निर्णय नव्या सरकारने घेतले. याबरोबरच संभाजीनगर, धाराशिव हे नामकरण, गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरमच्या सणांवरील निर्बंध हटवण्याचे निर्णय नव्या सरकारने घेतले. आगामी निवडणुकांसाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. ज्या बूथवर कमी मतदान झाले आहे, त्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी काम करणार आहोत. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत हा विचार घेऊन जाणार आहोत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या