पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (१४ जून) रोजी पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान देहू संस्थानकडून पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार तुकाराम पगडी तयार करण्यात आली. मात्र, त्या पगडीवर समोरच्या बाजूला मध्यभागी लिहिण्यात आलेली ओवी नंतर बदलण्यात आली आहे.
या पगडीवर ।। भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ॥ ही तुकाराम महाराजांची ओवी लिहिण्यात आली होती. आता या पगडीवरील ओवी बदलण्यात आली असून त्यावर ॥ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ॥ ही ओवी लिहिण्यात आली आहे. आता हीच पगडी उद्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात येणार आहे. या पगडीवरील ।। भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ॥ या पगडीवरील ओव्या कोणत्या कारणास्तव बदलण्यात आल्या. याबाबत गिरीश मुरुडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. देहू संस्थानकडूनही यावर प्रतिक्रिया देणे टाळण्यात आले आहे.