26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रटीईटी परीक्षेच्या तारखांत पुन्हा बदल

टीईटी परीक्षेच्या तारखांत पुन्हा बदल

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणा-या टीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये तिस-यांदा बदल करण्यात आला आहे. आता ३० ऑक्टोबर रोजी होणारी टीईटीची परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. टीईटी परीक्षेच्या तारखेत सलग तिस-यांदा बदल झाल्याने परीक्षार्थींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हा परीक्षेचा गोंधळ बंद करा, अशी मागणी होत आहे.

राज्यात ३० ऑक्टोबर २०२१ रोजी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यादिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. या अगोदर टीईटी परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र, त्या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आल्याने टीईटी परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले. ३१ ऑक्टोबरच्या दिवशी या आधीच पुढे ढकललेली आरोग्य विभागाची परीक्षा आल्याने ३१ ऑक्टोबरऐवजी टीईटी परीक्षा ३० ऑक्टोबर रोजी घेण्याचे सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले. मात्र, आता देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे ही तारीख पुन्हा बदलून २१ नोव्हेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी सतत परीक्षेची तारीख बदलत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

३ लाख ३० हजारांवर परीक्षार्थी
साधारणपणे टीईटी परीक्षेला राज्यातून ३ लाख ३० हजार ६४२ उमेदवार बसणार आहेत. यासाठी ५ हजार परीक्षा केंद्राचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. राज्यभरात होणारी ही परीक्षा आता २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सुधारीत वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या