मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी हनुमान चालिसा पठणावरून अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नोटिसीविरोधातील दावा राणा दाम्पत्याकडून मागे घेण्यात आला आहे.
मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राणा दाम्पत्याकडून हा दावा मागे घेतला असल्याची माहिती मिळत आहे. घरातील बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे राणा दाम्पत्याने स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे महिन्याभराची मुदत मागितली आहे.
राणा दाम्पत्याचे मुंबईतील खार येथील घर ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी तक्रार मुंबई महापालिकेला मिळाली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने खार येथील घराच्या अवैध बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटिसीला दिलेले उत्तर महापालिकेने अमान्य केले होते.
पुढील ७ ते १५ दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा कारवाई करू, असा इशाराही महापालिकेने दिला होता. आता महानगरपालिकेच्या नोटिसीविरोधातील दावा राणा दाम्पत्याकडून मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे जाहीर केल्यावर संपूर्ण वादाला सुरुवात झाली. कोर्टाकडून राणा दाम्पत्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर अटी-शर्थींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला.