24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रपिंपरीत कारचोर आणि पोलिसांमध्ये चकमक

पिंपरीत कारचोर आणि पोलिसांमध्ये चकमक

एकमत ऑनलाईन

पिंपरी : कार चोरी करून पळून जाणारे दोन चोरटे आणि रात्र गस्तीवरील तीन पोलिसांमध्ये चकमक उडाल्याची घटना घडली आहे. कारचोरांना थांबवून गाडीची चावी काढून घेणा-या पोलिस कर्मचा-यांवर चोरट्यांनी चाकूने वार केला. तर, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आणि चोरट्यांना पकडण्यासाठी चोरट्यांवर पिस्तूल रोखले. मात्र, अंधाराचा फायदा घेत दोन्ही चोरटे डोंगराच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास निगडी-देहूरोड रस्त्यावर हे नाट्य घडले आहे.

यमुनानगर परिसरातून शुक्रवारी रात्री चोरट्यांनी इको स्पोर्टस् कार चोरली. याच दरम्यान रात्र गस्तीवर असणारे पोलिस निरीक्षक अजय जोगदंड चिखली पोलिस ठाण्यात नोंद करून रात्र गस्तीसाठी निगडीच्या दिशेने निघाले होते. तेव्हा कारच्या मूळ मालकाने पोलिसांची गाडी पाहिली आणि गाडी थांबवून आपली कार चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कारचा क्रमांक, रंग आणि इतर माहिती घेत कारचा शोध सुरू केला.

जोगदंड यांनी याबाबत कंट्रोलला फोन करून माहिती दिली आणि नाकाबंदी लावण्यास सांगितले. त्यानंतर जोगदंड आणि त्यांच्यासोबत असणारे पोलिस अंमलदार निशांत काळे आणि प्रदीप गुट्टे हे भक्ती-शक्ती चौकातून जात असताना त्यांना चोरीला गेलेली इको कार दिसली. त्यामुळे पोलिसांनी आपल्या गाडीच्या लाईट्स बंद करून संबंधित चोरीच्या कारचा पाठलाग सुरू केला. मात्र, चोर कार वेगाने पळवत असल्याने ते पोलिसांच्या टप्प्यात येत नव्हते.

दरम्यान निगडी-देहूरोडच्या सीमेवर समोर एक ट्रक असल्याने चोरट्यांनी कारचा वेग कमी केला. त्यावेळी पोलिसांनी आपली गाडी या चोरीच्या कारला आडवी लावली. त्यानंतर पोलिस निरीक्षक जोगदंड हे वेगाने गाडीच्या खाली उतरून चोरट्यांकडे धावले. त्यांनी कारच्या खिडकीतून आत हात घालत चावी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या हातावर मारहाण केली. त्याच वेळी पोलिस कर्मचारी काळे आणि गुट्टे यांनी कारला दोन्ही बाजूने घेरले. चोरट्यांनी त्यांच्याकडील चाकूने पोलिसांवर वार केला. जोगदंड यांनी स्वत:वरील वार वाचवला. मात्र, एका पोलिस कर्मचा-याच्या हाताच्या बोटाला इजा झाली. त्यानंतर कारमध्ये आणखी दोन मोठे चाकू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

कारमधील हत्यारे पाहून पोलिस सावध झाले. जोगदंड यांनी परिस्थितीचा आढावा घेत आपली पिस्तूल बाहेर काढून चोरट्यांवर रोखली. मात्र, चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांना धक्का मारत पळ काढला. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला. मात्र, अंधार असल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून त्यातून चोरीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या