30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल : उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल : उपमुख्यमंत्री

एकमत ऑनलाईन

बारामती : मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षांत एक लाख सूक्ष्म व लघु उद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असल्याचे सांगतानाच, या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील. रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

बारामती विद्या प्रतिष्ठान येथील ग. दि. मा. सभागृहात मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमा अंतर्गत माझा व्यवसाय, माझा हक्क या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आ. अशोक पवार, आ. अतुल बेनके, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती प्रमोद काकडे, नगरसेवक किरण गुजर, समन्वयक कौस्तुभ बुटाला, सचिन पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी पी. डी. रेंदाळकर, ससुनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, एच. डी. एफ. सी. बँकेच्या श्रुती नंदुरबार, अ‍ॅक्सिस बँकेचे योगेश हरणे, बंधन बँकेचे सत्यजित मोहिते, रत्नाकर बँकेचे मिलिंद विचारे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून पाच वर्षांत एक लाख सूक्ष्म व लघु उद्योग प्रस्थापित करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट प्राप्त केले तर मोठ्या प्रमाणात युवक, युवतींना रोजगार मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना योजनेत सवलत देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व व्यवसाय, फिरते विक्री केंद्र या व्यवसायांमध्ये युवकांना व युवतींना संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील युवक -युवतींना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प उभे राहण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. राज्य शासनाकडून यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे व्यवसाय सुरू करू इच्छिणा-या युवक- युवतींनी पुढे यावे. योजनेचे निकष पूर्ण करणा-या गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील युवक, युवतींनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना योद्ध्यांचा गौरव
कोरोनायोद्ध्यांचा गौरव करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मानवतेच्या रक्षणासाठी कोरोना कालावधीत तुम्ही केलेले काम कायम स्मरणात राहील. राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे, याचे सर्व श्रेय कोरोनायोद्ध्यांना जाते. कोरोना कालावधीत डॉक्टर तसेच वैद्यकीय सेवा देणारे व सर्वच घटकांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आशिया बुक ऑफ रेकॉर्ड करणा-या सृष्टी जगतापचा सन्मान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या