पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा जिल्ह्याच्या दौ-यासाठी भल्या पहाटेच घराबाहेर पडतात, ही बाब एव्हाना नवीन राहिलेली नाही. मात्र, त्यांच्या याच सवयीमुळे पुण्यातील इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्यात घडलेल्या एका किश्श्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. पुण्यात बुधवारी सकाळी इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कार्यक्रमस्थळी पोहोचले.
या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यादेखील उपस्थित राहणार होत्या. मात्र, त्या येण्यापूर्वीच हा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर या कार्यक्रमात नीलम गो-हे आणि अजितदादांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.
नीलम गो-हे यांनी अजित पवार यांना शाब्दिक चिमटे काढले. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, अतिशय कार्यक्षम आहात. आमच्या अनेक प्रश्नांना तुम्ही वेगाने न्याय मिळवून देता. पण तुमचा कार्यक्रम पुण्यात असतो तेव्हा मी विचार करते की, आयोजकांना सांगावं का, आदल्या दिवशी आमची झोपायची व्यवस्था इकडे करा. आम्ही तुमच्यापेक्षा कितीही लवकर यायचा प्रयत्न केला तरी तुम्ही आमच्या आधीच येता. नऊच्या कार्यक्रमासाठी पावणेनऊला पोहोचले तर अजितदादा साडेआठला आलेले असतात. इतके ते कार्यक्षम आहेत. पण याचा अर्थ आम्ही उशिरापर्यंत झोपतो, असे नाही, असे नीलम गो-हे यांनी म्हटले.
यानंतर अजित पवार भाषणासाठी उभे राहिले. यावेळी अजितदादांनी नीलम गो-हे यांच्या प्रत्येक आक्षेपाला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, मी इथे लवकर आलो पण नऊ वाजेपर्यंत थांबायचे ठरवले होते. त्यामुळे आम्ही गोल खुर्च्या मांडून गप्पा मारत होतो. अनिल परब हेदेखील आमच्यासोबत होते. नीलमताई, तुम्ही अगदी योग्य वेळेत कार्यक्रमाला आलात.
तुमच्यासाठी आम्ही थांबलो होतो. पण नंतर परब साहेबच म्हणाले की, कार्यक्रम सुरू करा. मी त्यांना सांगितलं की, नीलमताई येतील, त्या उभसभापती आहेत, आपण थांबले पाहिजे. पण परब साहेबांनीच ऐकलं नाही, म्हणाले कार्यक्रम सुरू करा. आता ते शिवसेनेचे आहात, तुम्हीही शिवसेनेच्या आहात, तेव्हा तुमचं तुम्ही बघून घ्या, असे अजितदादांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला.