मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे़ राज्याच्या ३६ पैकी २८ जिल्ह्यांत कोरोनाचा फैलाव दिसू लागला आहे. गेल्या दोन आठवड्यांत या जिल्ह्यांत दररोज आढळणा-या कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. १० दिवसांपूर्वी २१ जिल्ह्यांत दिसत असलेले हे चित्र आता २८ जिल्ह्यांत दिसू लागले आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, अमरावती अकोला, यवतमाळ आदी ठिकाणी नवे हॉटस्पॉट्स बनत चालले आहेत.
फेब्रुवारीत आलेल्या लाटेचा केंद्रबिंदू विदर्भात असून, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे आणि अमरावती या ठिकाणीही रुग्णसंख्या वाढत आहे. या पाच जिल्ह्यांतल्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या राज्यातल्या एकूण सक्रिय कोरोनाबाधितांच्या सुमारे ६५ टक्के एवढी आहे. मुंबईच्या तुलनेत नागपुरात नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. मुंबईची लोकसंख्या १३० लाख, तर नागपूरची लोकसंख्या ५० लाख आहे. नवे रुग्ण सापडण्याचे राज्यातले सर्वांत जास्त म्हणजे ४१़५ टक्के प्रमाण अमरावतीत आहे.
शुक्रवारी मुंबईत १०३४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख २३ हजार ८७७ झाली, तर मृतांची संख्या ११ हजार ४६१ वर पोहोचली. मुंबईत १००० हून अधिक नवे रुग्ण सापडण्याचा शुक्रवार हा सलग तिसरा दिवस होता. बुधवारी ११४५, तर गुरुवारी ११६७ नवे कोरोनाबाधित आढळले होते. नागपुरात शुक्रवारी १०७४ नवे रुग्ण आणि सहा मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ४७ हजार ९०५ झाली असून मृतांची संख्या ४,३२० झाली आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, रोजच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचा दर १८ फेब्रुवारीला ०.१७ टक्के होता, तो आता ०़२७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४१७ दिवसांवरून २५६ दिवसांवर आला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, १५ ते २१ फेब्रुवारी या आठवड्यात रुग्णवाढीचा सर्वाधिक दर अमरावतीत १९़४ टक्के एवढा होता. अकोल्यात तो १०़५ टक्के, तर बुलडाण्यात ६़१ टक्के होता. राज्य पातळीवरील एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि औरंगाबादमध्येही एक फेब्रुवारीपासून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला तपासण्यांची संख्या वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असेही त्या अधिका-याने सांगितले़
अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा ७ दिवसांची संचारबंदी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात ७ दिवस संचारबंदी वाढवलीय. अमरावती, अचलपूर ,अंजनगाव सूर्जी शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेत. या तिन्ही शहरात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ तशीच राहणार आहे. तसेच नंतरची स्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचंही प्रशासनानं सांगितलंय.
तत्पूर्वी अमरावतीत २२ फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी होता. लॉकडाऊनची मुदत १ मार्चला सकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर पुकारला गेलेला पहिलाच लॉकडाऊन होता. मात्र आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतरही जिल्ह्यात कोरोनाबाधितांचं प्रमाण कमी झालेलं दिसत नाही. त्यामुळे अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आलीय.
१२ कंटेन्मेंट झोन घोषित
अमरावतीची परिस्थिती पाहता अमरावती महापालिकेने आधीच अमरावती शहरात १२ कंटेन्मेंट झोन घोषित केलेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना १४ दिवसांपर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिलेत. ने हा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.
लॉकडाऊनमुळे बस सेवा देखील बंद
अमरावतीमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे बस सेवा देखील बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होतं आहे. अमरावती हे विभागाचे ठिकाण असून या ठिकाणी नागपूर, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, औरंगाबादसह इतर जिल्ह्यात बस सेवा सुरु राहतात. मात्र, इतर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. बाहेर काढले जाणारे अनेक प्रवासी बस स्थानकामध्ये थांबलेले आहेत. लॉकडाऊन असल्याने बस सेवा बंद आहे.
पुण्यात २४ तासांत ६ जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विदर्भात तर काही ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत पुणे शहरात कोरोनाचे ७३९ नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील तिघांचा पुणे शहरात आज मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ४१२ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे २६० क्रिटिकल रुग्ण असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १ हजार ९२८ वर जाऊन पोहोचली आहे.
त्यामध्ये सर्वांत समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल १ लाख ९२ हजार ५०१ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे ४ हजार ५७४ रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळे ४ हजार ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत असे सांगण्यात आले आहे. विना मास्क फिरणा-यांवर पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.
सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव