मुंबई : राज्यभरात सध्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. नांदेडनंतर रायगडमध्येदेखील भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने उत्तेजक औषध घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिस भरतीत असे गैरप्रकार टाळण्यासाठी सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मैदानावर चाचणीसाठी येणा-या प्रत्येक उमेदवाराची आता कसून तपासणी करण्यात येत आहे.
नांदेड जिल्हा पोलिस दलातील १८५ पोलिस शिपाई पदासाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. २ जानेवारीपासून पोलिस मैदानावर १८५ पोलिस शिपाई पदासाठी कागदपत्र तपासणी आणि छाननी झाल्यानंतर आता मैदानी चाचणी सुरू आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान शनिवारी एका उमेदवाराजवळ उत्तेजित करणारे मसल बूस्टर अमली औषध आणि सिरींज आढळून आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या उमेदवाराला वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याच्या अहवालाची आता पोलिस प्रतीक्षा करीत आहेत. या अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. त्यामुळे नांदेड पोलिसांनी खबरदारी घेत मैदानावर येणा-या उमेदवारांची आता कसून तपासणी सुरू केली आहे.
असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडे यंत्रणा नाही
नांदेड आणि रायगड जिल्ह्यात अशा घटना उघड झाल्या आहेत. पण असे गैरप्रकार रोखण्याची पोलिसांकडे सध्या यंत्रणाच नाही. यामुळे पहाटे उठून सराव करणा-यांवर अन्याय तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालघरचा तरुण भरतीसाठी अपात्र
शनिवारी पालघर येथील एका उमेदवाराची संशयावरून झाडाझडती घेतली. त्यानंतर त्याच्याकडे ऑक्सिबूस्टर हे शक्तीवर्धक औषध आणि रिकामे सिरींज आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानंतर त्याच्यावर कारवाई होणार आहे. परंतु पोलिस भरतीसाठी त्याला अपात्र करण्यात आले आहे.