मुंबई : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयी घोडदौडीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. नवख्या तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्यापर्यंत सर्वांच्याच तोंडाला फेस आणला असे म्हणत त्यांनी तेजस्वी यादव यांचेही कौतूक केले.
बिहार निवडणूक निकालांच्या कलांबाबत मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीसांचे अभिनंदन करताना संजय राऊत म्हणाले की, नक्कीच जे जिंकले त्यांचे अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे. फडणवीस बिहारचे प्रमुख होते. त्यांना महाराष्ट्राचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी येथून बिहारमधील सूत्रे नक्कीच हलवली असतील. संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. मोदींनी १७ ते १८ सभा घेतल्या. तरीही ३० वर्षांचे तेजस्वी यांनी सर्वांना कामाला लावले. तोंडाला फेस आणला हे मान्य करावे लागेल .
ज्या पक्षाचा नेता तीनवेळा मुख्यमंत्री राहिला असेल आणि तिस-या क्रमांकावर जात असेल तर विचार करण्याची गरज आहे. याबद्दल आत्मचिंतन, विश्लेषण केले पाहिजे. विकासाचा मुद्दा योग्य असल्याचे जनतेने दाखवून दिले आहे, अशी टीका ही त्यांनी नितिशकुमार यांच्या जदयूवर केली.
बिहारमध्ये भाजपाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असे एका सूरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. कारण जो खेळ महाराष्ट्रात खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यावर आम्ही जो पलटवार केला त्यानंतर भाजपा आपल्या मित्रांशी तसे करणार नाही. शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकते हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपाला त्यांना करावेच लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपाला हाणला आहे.
काँग्रेसने चांगली कामगिरी केली नाही
काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असते, अशावेळी वेळप्रसंगी तेजस्वी यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी मदत करता आली तर पहावी अशी शिवसेनेची भूमिका होती असेही ते म्हणाले.
बायडेन, हॅरिस यांचा २० जानेवारीला शपथविधी