22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसने चाणक्‍य गमावला... अहमद पटेल यांना मान्यवरांची श्रद्धांजली

काँग्रेसने चाणक्‍य गमावला… अहमद पटेल यांना मान्यवरांची श्रद्धांजली

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) ज्येष्ठ व अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती, अशी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

काँग्रेसचे जेष्ठ नेते व श्रीमती सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे आज कोरोनामुळे दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे चाणक्य होते असे सांगितले. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांच्या निधनाने काँग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

चाणाक्ष, बुद्धिमान नेता गमावला ! -राज ठाकरे
काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते अशा भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्‍त केल्‍या. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. ४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच या शब्‍दांत राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांना श्रदधांजली अर्पण केली आहे.

समर्पित,कुशल संघटक व रणनितीकार गमावला ! -बाळासाहेब थोरात
अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःख असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनितीकार गमावले आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्‍या भावना व्यक्त केल्या आहेत. वयाच्या २६ व्या वर्षी अहमद पटेल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राजकीय पेचप्रसंगावेळी कौशल्याने तोडगा काढणारे उत्तम रणनितीकार म्हणून त्यांची ओळख होती. अनेकवेळा मंत्रीपदाची संधी असताना त्यांनी ती न स्वीकारता निरपेक्ष भावनेने पक्ष संघटनेत काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूतीसाठी मोठे योदगान दिले आहे. कायम स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यासाठी ते ओळखले जायचे. आपल्या भूमिकांशी ठाम राहणे, पक्षहित सर्वात प्रथम ठेवणे, देशभरातल्या नेत्यांशी सुसंवाद या त्यांच्या कामाच्या खास बाबी होत्या. महाराष्ट्रातही विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आणि मार्गदर्शन होते.

गांधी भवन येथे आदरांजली
अहमद पटेल यांना गांधी भवन येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर हे यावेळी उपस्थित होते. अहमद पटेल यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, सरचिटणीस मोहन जोशी, सचिव राजाराम देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाविषयक निर्देशांचे पालन करा; अन्यथा दंडात्मक कारवाई

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या