22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रयोगी सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसची मुंबईत निदर्शने !

योगी सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसची मुंबईत निदर्शने !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१ (प्रतिनिधी) हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की व अटकेचे तीव्र पडसाद महाराष्‍ट्रातही उमटले. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला. हातरसच्या पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी केलेल्या दंडेलशाहीचा महाराष्ट्र काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाही विरोधात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आ. झिशान सिद्दीकी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, उत्तर प्रदेशात कायद्याचे नाही तर जंगलराज आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशात महिला व मुलींच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत. हाथरस येथील अमानवीय घटनेतील आरोपींनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार करत आहे त्यामुळेच राहुल गांधी गांधी आणि प्रियंका गांधी यांना हाथरस येथे जाऊ दिले जात नाही. काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. भाजप सरकारच्या दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. पीडित कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सरकार विरोधात संघर्ष करत राहील असे थोरात म्हणाले.

युपी पोलिसांची दंडेलशाही निंदाजनक !
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली हे अतिशय निंदाजनक असून या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जाहीर निषेध केला आहे.

कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे, बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी संसद सदस्य आणि कॉंग्रेसचे नेते असलेले राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. त्याठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे असा सवाल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.

नाव रामाचे, कृती नथुरामाची ! – जयंत पाटील
महात्मा गांधींचे नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची… रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली आहे असा टोला लगावताना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला. हाथरसमधील पीडीत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले.

देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे असेही जयंत पाटील म्हणाले. भाजपाने ज्यापध्दतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सहस्रकुंड धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण पडुन सामुहिक आत्महत्या केल्याची चर्चा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या