मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदे गटाच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि शिवसेना पक्षप्रमुखांवर मुख्यमंत्रिपद सोडण्याची वेळ आली.
यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पत्राच्या माध्यमातून भावनिक साद घातली होती. यावेळी त्यांनी पत्रात निष्ठेसंदर्भातही भाष्य केले. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पत्रानंतर आता बंडखोर आमदार उदय सामंत यांनी शिवसैनिकांना पत्र लिहिले आहे.
विशेष म्हणजे या पत्रात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि वाघाचा फोटो आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या फोटोला उदय सामंत यांच्या पत्रात कुठेही स्थान नसल्याचे दिसते. उदय सामंत यांच्या पत्रात अनेक मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली आहे. दरम्यान, शिंदे-ठाकरेंचे जुळू नये म्हणून कोण कट रचतेय? हा निशाणा देखील पत्रातून सोडण्यात आला आहे.