अमरावती : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यावरही अतिवृष्टी झाल्यास निवडणूक कार्यक्रमात बदल केला जाईल, अशी ग्वाही राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाची भूमिका मान्य केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दोन आठवड्यांत सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला दिला होता. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
‘‘देशभरामध्ये संविधानाप्रमाणे वागायचे नाही असेच ठरलेले दिसत आहे. सभागृहाचा पाच वर्षांचा कालखंड संपण्याआधीच निवडून आलेल्या सदस्यांना गठित करणे गरजेचे आहे आणि ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. दुर्दैवाने राज्याच्या निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग्य वेळी घेतल्या नाहीत. त्यावर दाखल केलेल्या याचिकेवरून कोर्टानेसुद्धा घटनेचा अपमान करण्याचे ठरवले आहे असेच दिसते. ताबडतोब निर्णय घेऊन निवडणुका घ्या सांगण्याऐवजी तुम्हाला योग्य वाटत असेल तेव्हा निवडणुका घ्या असे सांगणे घटनेला धरून नाही,’’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘‘घटनात्मक चौकट तोडण्याची प्रक्रिया जी केंद्र शासनापासून सुरू झालेली आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने भर घालू नये ही आमची अपेक्षा आहे. राज्य सरकारला थेट भरती करण्याचा अधिकार नसून ते आज सुरू आहे. अशा गंभीर प्रश्नांवर भर देण्याऐवजी सुप्रीम कोर्ट या देशाची चौकट कशी मोडेल असाच प्रयत्न करत आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाला विनंती करत आहोत की त्यांनी घटनेची पायमल्ली होणार नाही हे पाहावे’’, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.