मुंबई, दि. २२(प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांनी व मंत्र्यांनी आपले दौरे, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. भाजपानेही वीजेच्या प्रश्नासाठी पुकारलेले जेलभरो आंदोलन स्थगित केले आहे. मनसेने मात्र कोरोनाच्या वाढलेल्या आकड्यांबाबतच संशय घेताना नेमका अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना कसा वाढतो असा सवाल करत सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याचा आरोप केला आहे.
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या परत वाढीला लागल्याने दुसऱ्या लाटेचे संकट समोर उभे राहिले आहे. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर पुढील काही दिवस बंदी घालण्याची घोषणा केली होती. राजकीय पक्षांना व नेत्यांनाही त्यांनी सहकार्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार बहुतांश मंत्र्यांनी व नेत्यांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शऱद पवार यांनी १ मार्चपर्यंतच सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. तर भाजप नेते व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारचे जलेभरो आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही २३ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे पुढे ढकलले आहेत. राज्याचे ऊर्जा मंत्री डाँ. नितीन राऊत यांनी त्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये आयोजित केलेला स्वागत सोहळा रद्द केला आहे.
मनसेला मात्र बनावाचा संशय !
कोरोनाच्या वाढलेल्या आकडेवारीबाबत मनसेने मात्र संशय व्यक्त केला आहे. सरकारडून आलेली आकडेवारी संशयास्पद आहे. नेमका अधिवेशन तोंडावर आल्यावरच आकडे कसे वाढले ? असा सवाल करताना, अधिवेशन टाळण्यासाठी करोनाचे आकडे वाढवून सांगितले जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. ठाकरे सरकार जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवून अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचं आहे. अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीयत म्हणून सरकार आता लॉकडाउनची धमकी देत असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली.
मनसेचा अधिवेशनाशी काय संबंध – अनिल परब
मनसेने केलेल्या आरोपांचा समाचार घेताना मनसेचा अधिवेशनाशी काय संबंध आहे ? असा उपरोधिक सवाल संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केला. त्यांचा एकच आमदार आहे व त्याला गैरहजर राहण्याचा अधिकार आम्ही देऊ. स्टेडियमच्या बाहेर बसणार्यांनी मैदानात कसं खेळावं हे शिकवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई व आजूबाजूच्या शहरात रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यात ३ रुपये वाढ