25.4 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रदिल्ली,गुजरात, गोवा व राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक !

दिल्ली,गुजरात, गोवा व राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक !

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सरकारचा निर्णय !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) दिल्लीसह काही राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट महाराष्ट्रात येऊ नये यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी करोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली असून करोना रुग्णांची संख्या तेथे मोठया प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातील स्थिती नियंत्रणात असली तरी दिवाळीनंतर नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना वेळीच खबरदारी घेतली नाही तर राज्यात दुसरी लाटच नव्हे तर कोरोनाची सुनामी येईल, असा इशारा दिला होता. आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे सुतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर आज दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्वे आज जाहीर करण्यात आली.

या राज्यातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासाच्या जास्तीत जास्त ७२ तास आधीचा हा चाचणी अहवाल आवश्यक असेल. कोरोनामुक्त असल्याचा अहवाल नसेल तर त्यांना विमानतळावर चाचणी करणे आवश्यक असून त्याशिवाय बाहेर येता येणार नाही. यासाठी विमानतळांवर चाचणीची व्यवस्था करण्यात येणार असून, या चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून घेण्यात येईल. या चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोना संसर्ग नसल्याचा रिपोर्ट सादर करावा लागेल. प्रवाशाच्या ९६ तास आधी हा करोना चाचणी करावी लागेल. तर रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची बॉर्डरवरच्या चेकपोस्टवर तपासणी केली जाईल. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, त्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर त्या प्रवाशाला कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचाराचा खर्च त्यालाच करावा लागेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या