मुंबई,दि.२४(प्रतिनिधी) राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना मंत्रालयापर्यंत याचे लोण पोचल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील कर्मचा-यांची दोन शिफ्टमध्ये विभागणी करून गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुख्य सचिव संजय कुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या वेळेचे नियोजन करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले आहेत. मंत्रालयातील कर्मचा-यांना एक दिवसाआड, तीन तीन दिवस किंवा एक एक आठवड्याच्या शिफ्टनुसार बोलवा, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत.
कोरोनामुळे मागच्यावर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन केल्यानंतर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही कमी करण्यात आली होती. प्रथम २५ टक्के, त्यानंतर ५० टक्के आणि प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर १०० टक्के उपस्थिती लागू करण्यात आली होती. मात्र मुंबई तसेच महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यातच मंत्रालयात वाढलेल्या गर्दीमुळे महसूल विभाग, शिक्षण विभागात ३५ हून अधिक कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी त्याचप्रमाणे गर्दी कमी करण्यासाठी कामाच्या वेळा बदलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले होते. त्यानुसार मुख्य सचिवांनी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सर्व विभागांच्या सचिवांना आदेश जारी केले आहेत.
मंत्रालयात कोणत्याही परिस्थितीत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन व्हायलाच हवे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याबाबत विभागांनी निर्णय घ्यावा. मंत्रालयात गर्दी होऊ नये यासाठी कर्मचार्यांना आठवड्याच्या शिफ्ट ड्यूटीजमध्ये बोलवा, कामाचे तास विभागून द्या, एक दिवसाआड किंवा तीन दिवसाआड ठराविक कर्मचार्यांना बोलवा. हे करताना कामावर कोणताही परिणाम होणार नाही याचीही काळजी घेतली जावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे जर सर्व कर्मचार्यांच्या उपस्थितीतही सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व उपाययोजना, कोरोनाचे सर्व नियम पाळून काम करता येत असेल तर त्याबाबतही विचार करावा, अशा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले