मुंबई,दि.२ (प्रतिनिधी) लॉकडाउनच्या काळात आलेली वाढीव वीज बीले कमी करण्याची मागणी राज्यभरातून करण्यात होत आहे. याबाबत ग्राहकांना कसा दिलासा देता येईल याची चर्चा सुरू असून दिवाळीपर्यंत निर्णय घेतला जाईल अशी माहिती उर्जामंत्री डॉ.नितीन राउत यांनी आज दिली.१२ ऑक्टोबरप्रमाणे पुन्हा वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी सर्व संबंधित कंपन्यांमध्ये कार्यक्षम संदेशवहन आणि समन्वयन यंत्रणा उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. राऊत म्हणाले की, १२ ऑक्टोबरला घडलेल्या वीजखंडित होण्याच्या घटनेमुळे अधिक उपाययोजना हाती घेण्याची गरज दिसून येत आहे. मुंबईचे महत्त्व लक्षात घेऊन या घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कळवा येथील राज्य भार प्रेषण केंद्र (एसएलडीसी) आज टाटा वीज कंपनी तसेच अदानी वीज कंपनीला भेट देणार आहे. वीजखंडित होण्याच्या घटनेच्या कारणांचा शोध घेणे, उपाययोजना करणे यासाठी ऊर्जा विभागाने तांत्रिक लेखापरीक्षण समिती नेमली आहे.
तसेच केंद्रीय वीज प्राधिकरण आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगानेही (एमईआरसी) स्वतंत्र समित्या नेमल्या असून त्या तिन्हीच्या निष्कर्षाच्या आधारे हाती घ्यावयाच्या उपाययोजनांविषयीची माहिती एमईआरसीसमोर मांडण्यात येईल. वीजवहन यंत्रणा तसेच मुंबईसाठीच्या आयलँडिंग यंत्रणेमध्ये काय सुधारणा करणे गरजेचे आहे त्याबाबत अभ्यास करण्यात येत असून पुढील वर्षात आधुनिकीकरणाच्या उपाययोजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.
डॉ. राऊत पुढे म्हणाले की, मुंबईसाठी खात्रीशीर आणि दर्जेदाररित्या वीज कशी उपलब्ध करता येईल या दृष्टीने प्रयत्नशील असून वीजपुरवठा खंडित होण्याची १२ ऑक्टोबरसारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी महापारेषण, एसएलडीसी, टाटा पॉवर कंपनी आणि अदानी एनर्जी कंपनी यांच्यात समन्वय साधण्याची कार्यक्षम संदेशवहन आणि समन्वय व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत.२०३० पर्यंत मुंबईची विजेची मागणी सुमारे ५ हजार मेगावॅट पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही गरज लक्षात घेऊन मुंबईला अखंडीत वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने वीजनिर्मितीमध्ये वाढ करणे, त्यासाठीचे नियोजन, त्याचा उत्पादन दर काय असेल आदींबाबत विचार करण्यात येईल. सध्या टाटा वीज प्रकल्पातील दोन संच बंद असून त्यातून अधिकची वीजनिर्मिती करता येईल तसेच तयार होणाऱ्या वीजेचा दर माफक असेल आदींबाबतही विचार करण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 25 रुग्ण; तर 39 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज