20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रनिवडणूक आयोगाचा संविधानावर घाव घालणारा निर्णय

निवडणूक आयोगाचा संविधानावर घाव घालणारा निर्णय

एकमत ऑनलाईन

छाननी न करताच निर्णय सुनावला, सावंत यांचा आरोप, नेत्यांच्या प्रतिक्रिया
मुंबई : निवडणूक आयोगाने सर्व तक्रारी आणि आम्ही उत्तर दिलेले त्याचीदेखील छाननी केलेली नाही. छाननी न करताच अवघ्या चार तासांत पक्ष व चिन्हाचा निर्णय दिला. निवडणूक आयोग कोणाच्या आदेशावर चालत आहे, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. देश हुकमशाहीकडे चालला आहे. छाननी न करता दिलेला निर्णय हा देशाच्या संविधानावर घाव घालणारा आहे, असा आरोप खा. अरविंद सावंत यांनी केला. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर सावंत पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकशाहीवर विश्वास ठेवणा-या जनतेच्या पाठीत सुरा खूपण्याचे काम केले जात आहे. भाजपचे अनेक लोक न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याआधीच शिंदेची शिवसेना खरी असल्याचे सांगत होते. त्यामुळे निवडणूक आयोगावर संशय निर्माण होत आहे. पण जेवढा आम्हाला त्रास दिला जाईल, तेवढी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना बळकट होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. तसेच खा. विनायक राऊत यांनीही निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात आम्हाला काही बोलायचे नाही. पुढे काय पावले उचलावी, यावर आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू, असे म्हटले. खा. अनिल देसाई यांनीही हा निर्णय अनपेक्षित होता. हा निर्णय धक्कादायक आहे, असे म्हटले.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, तो आम्हाला स्वीकारावा लागणार आहे. आता पुढची रणनीती काय आहे ते आम्ही ठरवू, असे म्हटले. तसेच दीपक केसरकर यांनी ज्यांची मेजॉरिटी जास्त त्यांचाच पक्ष असतो, असे म्हटले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला टोला लगावत संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही. म्हणणा-यांचे नावही संपले आणि चिन्हही, असे ट्विट केले. तसेच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आम्हाला आनंदही नाही, खंतही नाही आणि दु:खही नाही. कारण हा निर्णय भाजपशी संबंधित नाही, असे म्हटले.

आमच्यातल्या फितुरांच्या
साथीने तुम्ही जिंकलात
सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असे होत नाही. मोदी-शहाजी, फडणवीसजी तुम्ही जिंकलात, अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला, कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली. पण आम्ही खडकातून पुन्हा उगवू, असेही त्या म्हणाल्या.

गद्दारांचा नीच व निर्लज्ज प्रकार
आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत शिंदे गटावर हल्लाबोल केला. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला. पण महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. आम्ही लढणार आणि जिंकणारच, असे ते म्हणाले.

ये तो होना ही था : सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ये तो होनाही था. प्रथम सरकार गमावले, हिंदुत्व गमावले, चिन्ह, नाव आणि त्यानंतर सर्वच गमावणार. अर्थात, उद्धव ठाकरे गटाचा पराभव अटळ आहे, असे सोमय्या म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या