पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत पोहोचले असून लोकार्पणानंतर माळवाडीत त्यांची संवाद सभा होईल. दरम्यान श्री संत तुकाराम महाराज संस्थान व प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षा करून पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाची महिनाभरापासून तयारी सुरु आहे. संवाद सभेसाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून भाविक येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पावलोपावली खडा पहारा दिसून येत आहे. परिसरातील वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. मुख्य देऊळवाड्याला फुलांची सजावट करण्यात आलीय. मुख्य मंदिरात आगमन होताना चारशे वारकरी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते.
येथे उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. सर्वत्र दौऱ्याची लगबग असून देहूवासियांमध्येही उत्साह आहे. संवाद सभेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक हजर आहेत. येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने सभास्थळी पर्स, बॅग, रिमोट चावी, पाणी बाटली, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पॉवर बँक आदी वस्तू नेण्यास परवानगी नाही. रंगीत तालीम झेंडेमळा येथे हेलिपॅड केले असून तेथून मोटारीने पंतप्रधान देहूतील मुख्य मंदिरात जाणार आहेत. लोकार्पण कार्यक्रमानंतर सभास्थळी येतील. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्याची सोमवारी रंगीत तालीम घेण्यात आली.