मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून रोजी देहूत दाखल होत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिळा मंदिर आणि मुख्य मंदिर परिसराची पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली.
येत्या २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. तसेच सोहळ्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
काही दिवसांपूर्वी आचार्य तुषार भोसले आणि देहू संस्थानच्या विश्वस्त मंडळींनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यावेळी त्यांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले. मोदींनीही त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. आता मोदी १४ जूनला देहूत येणार असल्याची माहिती भोसले यांनी ट्विटरद्वारे दिली.