पुणे : पुण्याच्या चाकण एमआयडीसी हद्दीत जुगार खेळताना देहू संस्थानच्या विश्वस्तास रंगेहाथ अटक झाली, त्याच विश्वस्तावर आता देहू संस्थान कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यांची हकालपट्टी करण्याची देखील शक्यता आहे. अटकेतील विश्वस्त विशाल मोरेंना संस्थान बाजू मांडण्याची संधी देणार आहे. विशाल मोरे यांनी त्या संदर्भात खुलासा केला आणि ते दोषी नाहीत हे सिद्ध झाले नाही तर संस्थानच्या नियमानुसार त्यांची विश्वस्त पदावरून हकालपट्टी करण्यात येणार आहे, असे संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
विश्वस्त विशाल मोरेसह माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे आणि देहूतील राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक मयूर टिळेकर, नगरसेविकेचा पती विशाल परदेशी यांच्यासह २६ जण अटकेत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यावर पर्दाफाश झाला आणि राजकिय वर्तुळासह वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली, म्हणूनच संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त विशाल मोरे यांच्याबद्दल कठोर पाऊल उचलताना दिसत आहेत.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील चाकण एमआयडीसी हद्दीत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. देहूगाव ते येलवाडी मार्गावरील एक बंदावस्थेत कंपनी आहे. त्या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर हा पत्त्यांचा खेळ रंगला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याची खातरजाम केली आणि त्यानुसार मंगळवारच्या रात्री सापळा रचला.
पोलिसांनी तिथे छापा टाकला आणि सर्वानाच धक्का बसला. कारण पकडलेल्या सहवीस जणांमध्ये देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे ही जुगार खेळत होते. जुगार खेळणा-यांमध्ये देहू संस्थानचे आजी-माजी विश्वस्त सापडल्याने वारकरी सांप्रदायामध्ये एकच खळबळ उडालेली आहे