पुणे : महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या ३० वर्षापासून बालेकिल्ला असणा-या भाजपला निवडणूक अवघड का गेली याचे कारण शोधण्यासाठी भाजपला नक्की विचार करावा लागणार आहे. दरम्यान रविंद्र्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, फडणवीस भाजपला रसातळाला घेऊन जातील, त्यांनी निवडणुकीत किती पैसा वाटला किती काही केल तरी हा क्षणिक आनंद आहे. त्यांची सत्ता गेल्यावर लोक नमस्कार देखील घालणार नाही.
विरोधकांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करायचे हाच अजेंडा घेऊन फडणवीस काम करतात. लोकशाहीची हत्या कशी करतात ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावे. हेमंत रासने यांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी पाडले. असे रविंद्र धंगेकर म्हणाले होते. त्यांवर भाजपचे नेते आणि पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी ट्विट करत धंगेकरांना खोचक सल्ला दिला आहे.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपले अभिनंदन आपण देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले. आपण ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्रजींनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी बोलताना तारतम्य बाळगा. देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत.
धंगेकर-रासने संघर्षाला सुरूवात
कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिले, त्या जबाबदारीचे भान ठेवा. बाकी राजकारण करायला खूप विषय आहेत. असे ट्विटमध्ये लिहिले आहे. त्यामुळे आतापासून धंगेकर आणि रासने संघर्ष कसबा आणि महाराष्ट्राला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.