30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रवीजपंपांची थकबाकी भरल्यास सवलत; अजित पवार यांचे आश्वासन

वीजपंपांची थकबाकी भरल्यास सवलत; अजित पवार यांचे आश्वासन

एकमत ऑनलाईन

राहुरी : राज्यात वीज बिलांची ४५ हजार ७१० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात वीजपंपांची १५ हजार ३२५ कोटी रुपये आहे. शेतक-यांनी थकित वीज बिल भरल्यास त्यावर शेतक-यांना व्याज व दंड आकारणी यात सवलत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ग्रामपंचायतींनी शासकीय जमीन महावितरणला उपलब्ध करून दिल्यास त्यांनाही दरवर्षी महावितरणकडून हक्काचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, असेही पवार म्हणाले.

राहुरीत सहा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे होते. पवार म्हणाले, कृषि वीज बिल वसुलीसाठीच्या या योजनांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा. नगर जिल्ह्यात ४ हजार ९९८ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. जिल्ह्यात वसूल होणा-या रकमेपैकी ६६ टक्के निधी वीजनिर्मितीच्या, वीज वितरणाच्या जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध केला जाईल. मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत जिरायत जमीन शेतक-यांनी महावितरणला उपलब्ध करून दिल्यास एकरी ३० हजार रुपये महावितरणकडून दिले जातील, असे पवार म्हणाले. शासकीय जमिनी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या तर दरवर्षी त्यांनाही उत्पन्नाचा एक निश्चित स्रोत उपलब्ध होईल. वांबोरी चारीच्या सुधारित दुस-या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. निळवंडे धरणाच्या कालव्याची कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पवार यांनी दिले.

कोरोना योद्ध्यांचा गौरव
कोरोनायोद्ध्यांचा गौरव करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मानवतेच्या रक्षणासाठी कोरोना कालावधीत तुम्ही केलेले काम कायम स्मरणात राहील. राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे, याचे सर्व श्रेय कोरोनायोद्ध्यांना जाते. कोरोना कालावधीत डॉक्टर तसेच वैद्यकीय सेवा देणारे व सर्वच घटकांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कामाचा उत्साह वाढतोय
शरद पवार हे वयाच्या ऐंशीव्या वर्षी कार्यरत आहेत. सुप्रिया सुळेदेखील पन्नाशीला पोहचल्या आहेत. मी पण साठी ओलांडली. मात्र, वय वाढल्याचे कळेना. वय वाढतेय तसा दिवसेंदिवस उत्साह वाढतोय हे सांगताना कामाचा उत्साह वाढतोय, दुसरे काही नाही, असे पवार मिश्किलपणे म्हणाले.

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल : उपमुख्यमंत्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या