मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करणा-या अधिका-यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आर्यन खानला कार्डेलिया क्रूझवरून एनसीबीने ०२ ऑक्टोबर २०२१ ला अटक केली होती.
एनसीबीतील अधिकारी विश्वविजय सिंग यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांच्याशिवाय विश्वनाथ तिवारी यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. दोघांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये बडतर्फ करण्यात आले आहे. विश्वनाथ तिवारी यांनी विनापरवानगी परदेशवारी केल्याचा आरोप आहे तर विश्वविजय सिंग यांना २०१८ च्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. संबंधित अधिका-यांच्या चौकशीचे आदेश राकेश अस्थाना यांनी दिले होते.
एनसीबीच्या मुंबईच्या टीमविरोधातील आरोपानंतर कार्डेलिया छापा प्रकरणी वेगळी चौकशी केली गेली होती. ही चौकशी नोव्हेंबर २०२१ मध्ये संपली. यानंतर सात अधिका-यांविरोधात विभागीय कारवाई सुरू होती. पण या चौकशीत काय झालं हे समोर आलेलं नाही. आर्यन खानसह इतरांना एनसीबीकडून ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे ड्रग्ज तस्करीचा आरोप करण्यात आला होता.
पण सबळ पुराव्याअभावी आर्यन खानला २८ ऑक्टोबर २०२१ रोजी जामीन दिला होता.
एनसीबीने छाप्याची चौकशी करण्यासाठी उप महासंचालक संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती. यामध्ये एसआयटीला आरोप सिद्ध करण्यासाठी छाप्यात आर्यन खान ड्रग्ज तस्करी करत असल्याचे सबळ पुरावे सापडले नाहीत. त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची दुस-या विभागात बदली करण्यात आली होती.