नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी १९२५ मध्ये सुरू केलेल्या नाशिकरोड येथील चलनी नोटांच्या कारखान्यात दुर्मिळ नोटांचा खजिना नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. अडीच रुपयांच्या नोटेपासून ते दहा हजारांच्या नोटेपर्यंत अशा विविध प्रकारच्या नोटा नाशिकच्या नोट प्रेसमध्ये पाहायला, अनुभवयाला मिळत आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या वतीने जुन्या नोटांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. जेल रोडवरील समोरील जागेत सुरू असलेल्या तीन दिवसीय प्रदर्शनात नाशिककरांना दुर्मिळ नोटा बघण्याची अनमोल संधी मिळत आहे.
ब्रिटिशांच्या काळात भारतात चलनात आणलेल्या नोटापासून ते नाशिकरोडच्या नोट प्रेसमध्ये छापण्यात आलेल्या पहिल्या नोटेचा दुर्मिळ खजिना, नोटांवरील पोस्टचा रंजक इतिहास, महात्मा गांधीजींच्या नोटांची मालिका इतकेच कशाला तर नोटांचा बदलत गेलेला आकार आणि इतर देशांचे चलन स्थापण्याचा अद्भूत प्रवास नाशिककरांना अनुभवता येणार आहे.
दरम्यान भारतीय नोटांच्या अठराव्या शतकापासूनचा इतिहास ते आजपर्यंतच्या वाटचालीची इत्यंभूत माहिती देणारे, ज्ञानात मोलाची भर घालणारे हे भव्य प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले आहे. नोटांबाबतची इत्यंभूत माहिती देण्यासाठी १५ तज्ज्ञ अभ्यासू कर्मचारी आहेत.
प्रदर्शनात अडीच रुपयांची नोट, पाच हजार आणि दहा हजारांची नोट, एकदा वापरात आलेली, फाडून टाकली जाणारी आणि हाताने बनवलेली नोट अशा प्रकारच्या नोटा पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत आपण नोटेवर गांधीजी किंवा राजा-महाराजांचे चित्र पाहिले असेल मात्र इराकच्या नोटेवर एका लहान मुलाचे चित्र छापण्यात आले होते.
इथल्या नोटांची छपाई
नाशिकरोड येथील नोट प्रेसमध्ये विविध देशांतील चलनी नोटा छापण्यात आल्या होत्या. यामध्ये ईस्ट आफ्रिका, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, इराण या देशांचे चलन देखील छापण्यात आले आहे. १९५० अगोदरपर्यंत अशा नोटांची छपाई सुरू होती. तर १९३१ मध्ये नाशिकरोडच्या प्रेसमध्ये इराकसाठी दिनार हे चलन छापण्यात आले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या नोटेवर असलेले पोट्रेट हे तेरा वर्षे वयाच्या बालकाचे होते. एखाद्या लहान मुलाचे चित्र असलेली ही जगातील पहिलीच नोट होती. आज या नोटेची किंमत जवळपास ३० लाख रुपये इतकी आहे.