23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नाराजी

विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नाराजी

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेने विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला असून आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतले नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर आमची नैसर्गिक आघाडी नाही, ही तात्पुरती आघाडी आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत नवा ट्वीस्ट आला आहे.

शिवसेनेत बंडाळी झाल्यापासून महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे एकला चलो रेचे धोरण पहायला मिळाले आहे. याचे पडसाद राज्यसभेच्या निवडीवेळीच उमटले होते पण ते आता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडीवेळीच महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने अप्रत्यक्षरित्या आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला होता. पण काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची नाराजी उघड होत आहे.

आमची नैसर्गिक आघाडी नसून ही आघाडी एका विपरीत परिस्थितीत तयार झाली आहे. आम्ही विरोधीपक्षात बसणार होतो पण जी युती झाली ती पर्मनंट नाही असे पटोले म्हणाले होते. त्यानंतर पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडीवर आता शिक्कामोर्तब झाले असून त्यावर आम्हाला वाद वाढवायचा नाही असे मत अजित पवारांनी व्यक्त केले असून पटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, पक्ष मोठा असल्यामुळे अनेकजण मत मांडत असतात मात्र विधीमंडळात जे ठरेल त्यावरच पक्षाचे कामकाज चालते असे मत पवार यांनी व्यक्त केले.

शिवसेनेने विधानपरिषद विरोधीपक्षनेत्याच्या निवडीवेळी आम्हाला विश्वासात घेतले असते, चर्चा केली असती तर बरे झाले असते असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी केलं. अंबादास दानवे यांच्या निवडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जाहीर नाराजी व्यक्त केली जात असल्यामुळे महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या