22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा वाद पेटला

राज्यात पुन्हा वाद पेटला

एकमत ऑनलाईन

मुंबई : सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणा-या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राबाबत मल्लिनाथी करून वादळ निर्माण केले आहे. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई ही आर्थिक राजधानीही राहणार नाही, या कोश्यारींच्या वक्तव्यावर शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आक्षेप घेत अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेत्यांनी कोश्यारी यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे सांगत सारवासारव केली.

मुंबईतील अंधेरीमधील एका चौकाला काल दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. महाराष्ट्राच्या व विशेषत: मुंबई आणि ठाण्याच्या विकासात राजस्थानी व गुजराथी समाजाचे मोठे योगदान असल्याचे सांगताना या लोकांमुळेच मुंबईत पैसे आहेत व ते निघून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान केले.

या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरमरीत टीका केल्यानंतर राजभवनातून एक प्रसिद्धी पत्रक प्रसारित करून सारवासारव करण्यात आली.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास
महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मात्र, माझ्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणे विपर्यास केला गेला, असा दावा राज्यपालांनी केला.

मुंबई मराठी माणसांचीच : मुख्यमंत्री
राज्यपालांच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण त्यांच्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. मराठी माणसाच्या कष्टामुळे मुंबई उभी आहे. याचे श्रेय कोणाला घेता येणार नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे योगदान सर्वांना माहिती आहे, असे शिंदे म्हणाले.

समाजात फूट पडण्याचा प्रयत्न करणारे पार्सल तुरुंगात पाठवा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वीही सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता मराठी माणसाचा अपमान केला आहे. राज्यपालपदाच्या काळात त्यांनी महाराष्ट्रातल्या सुंदर गोष्टी पाहिल्या. पण कोल्हापूरी वहाणा पाहिल्या नसतील तर त्यांना कोल्हापुरी वहाण दाखववण्याची गरज आहे, अशा जळजळीत शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात जाती धर्मावरून फूट पाडणा-या राज्यपाल कोश्यारी यांचे पार्सल घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे? नव्या हिंदुत्वाचे मोड फुटलेले शिंदे सरकारने राज्यपालांबाबत काय भूमिका घेणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

टोपी-अंतर्मनाचा रंग एकच
राज्यपालांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंत:करणाचा रंग एकच असल्याचा जळजळीत फटकारा लगावला. या राज्यपालांबद्दल बोलावे तेवढे कमी आहे. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ््या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली, असे टीकास्त्र सोडले.

मराठी माणसाला डिवचू नका
महाराष्ट्रात मराठी माणसाने इथले मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यांतील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना, दुसरीकडे त्यांना असे वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितले म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सुनावले.

अतिशयोक्ती अलंकार : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसांनी आपण कोश्यारींच्या विधानाशी सहमत नसल्याचे सांगितले. राज्यपालांचे विधान अतिशयोक्ती अलंकार असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात ब-याचदा अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो. त्याप्रमाणे राज्यपाल बोलले असतील, अशी सारवासारव त्यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या