मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानामुळे सध्या राज्यात मोठा गदारोळ माजला आहे. याबद्दल आता राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केला आहे. उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. मराठी माणसाला डिवचू नका अशी टीका राज ठाकरे यांनी राज्यपालांवर केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात मराठी माणसाने इथले मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यांतील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असे वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितले म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाहीत. मराठी माणसाला डिवचू नका, इतकेच आत्ता आपल्याला सांगतो.
राज ठाकरेंनी ट्विट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दलचा राग व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे पद आहे. म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या जातात.
सर्वज्ञानींचे अभिजात मराठी म्हणजे १७ सेकंदांत २७ शिव्या : चित्रा वाघ
यात वाघ म्हणतात की, सर्वज्ञानींचे अभिजात मराठी म्हणजे १७ सेकंदांत २७ शिव्या. वर्ल्ड बुक ऑफ गिनीजमध्ये नोंद व्हायला हरकत नाही, असे म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे.
राज्यपालांचे वक्तव्य चुकीचे नाही : प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुबंईसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध केला जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थ केले आहे. राज्यपालांचे वक्तव्य चुकीचे नाही, मी त्याचे समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.