मुंबई : जून महिना संपत आला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. धरणातही आजमितीला केवळ २१.८२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आतापर्यंत खरिपाची केवळ १३ टक्के पेरणी झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊसपाणी व खरिपाच्या पेरणीबाबत सादरणीकरण करण्यात आले. यंदा पावसाला लवकर सुरुवात होईल, असा अंदाज होता. परंतु मान्सूनचे आगमन लांबले व उशिरा पाऊस सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यांत अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या वर्षी राज्यात आजच्या दिवशी सरासरी २७० मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ १३४ मिमी पाऊस झाला आहे.
स्वाभाविकच पेरण्याही खोळंबल्या आहेत. पावसाअभावी सर्वच विभागात पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. मागील दोन तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पेरणीची कामे सुरु झाली आहेत. ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जूनमध्ये सरासरीच्या ५० टक्के पाऊस कमी
राज्यात बहुतांश ठिकाणी जून महिना संपूर्ण कोरडा गेला आहे. त्यामुळे जून महिन्यात एकूण सरासरीच्या ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात तर हा आकडा यापेक्षाही कमी आहे. कारण राज्यात सर्वात कमी पाऊस विदर्भात झाला आहे. राज्याच्या परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यात पावसानं जूनची सरासरी ओलांडली आहे. या तिन जिल्ह्यांत मिळून सरासरी ३२ टक्के अधिक पाऊस पडला आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातही सरसकट पाऊस नाही. १० पैकी फक्त ३ तालुक्यांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे इतरत्र चिंता भेडसावत आहे.
राज्यात फक्त १३ टक्के पेरण्या
राज्यात ऊस व खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर असून आतापर्यंत २०.३० लाख हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी झाली आहे. म्हणजे आतापर्यंत सरासरी १३ टक्केच पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.
पाणीसाठ्यात घट
धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील धरणातील पाणीसाठा २६.४३ टक्के होता. पण यंदा हाच पाणीसाठा २१.८२ टक्क्यांवर आला आहे. सध्याच्या घडीला पुण्यातल्या धरणातील पाणीसाठा सर्वात कमी म्हणजे १२.८२ टक्क्यांवर आला आहे. २७ जूनअखेर राज्यातील ६१० गावे आणि १२६६ वाड्यांना ४९६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.