चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणा-या शीतल आमटे यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, डॉ. शीतल आमटे यांच्याशी नजीकच्या काळात संभाषण झालेल्या ९० टक्के लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे. डॉ. शीतल यांचे नोकर आणि घरगुती मदतनीस यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच, त्यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने मुंबईतील आयटी तज्ज्ञांकडे पाठविला आहे. यातील काहींमध्ये सॉफ्टवेअर लॉक आहे.
चौकशीत काय निष्पन्न झाले?
आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. नेमके विष कोणते होते याबाबतचा खुलासा पोस्टमोर्टमच्या सविस्तर अहवालात स्पष्ट होणार आहे. मात्र आजही प्राथमिक पोस्टमोर्टम अहवाल पोलिसांनी जाहीर केलाच नाही.
शीतल आमटे आणि सामाजिक काम
डॉ. शीतल आमटे या विकास आणि भारती आमटे यांच्या कन्या होत्या. २००३ मध्ये नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते़ त्या एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा होत्या. जानेवारी २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचद्वारे यंग ग्लोबल लीडर २०१६ साठी त्यांची निवड झाली होती. एप्रिल २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्राकडूनही नवोदित राजदूत म्हणूनही शीतल आमटे यांची निवड करण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शीतल आमटे यांनी कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा जोपासण्यासाठी आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, शीतल आमटे या अपंगत्व विशेष तज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यानंतर त्यांनी महारोगी सेवा समितीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतले होते.
कौटुंबिक वाद
मध्यंतरीच्या काळात शीतल आमटे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल आणि संस्थेतील विश्वस्तांबद्दल नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, दोन तासांनंतर त्यांचा फेसबुकवरील हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला होता. त्यांच्या या व्हिडीओमुळे आमटे कुंटुंबातील वादावर चर्चा रंगली होती. परंतु, आमटे कुटुंबाकडून एक पत्रक प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते.