नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अवकाळी पावसामुळे सोन्यासारख्या पिकांची माती झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून टपोरी द्राक्ष पिकास रद्दी पेपरपेक्षाही कवडीमोल भाव मिळत असल्याचे चित्र आहे. शेतक-याने साठ ते सत्तर रुपये किलोने ठरविलेले द्राक्ष आज निम्म्या भावाने विकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सलग ५ दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागातील गहू, हरभरा, द्राक्ष पिकांना फटका बसला आहे. तब्बल २ आठवड्यांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षासह शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले. अगदी रद्दीला मिळावा, याहीपेक्षा कमी मोल भाव द्राक्षांना मिळत आहे. एकीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यातच कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. नाशिक जिल्ह्याला गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. काढणीला आलेला गहू, द्राक्ष, हरभरा पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, गहू आणि संत्री बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. पावसामुळे द्राक्षासह शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.