मुंबई : राज्यात गेल्या २ दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल दिसून येत आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण आहे, तर काही भागात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. रबी पिकांसाठी थंडी पोषक असते. परंतु सध्या अजूनही वातावरणात उकाडा आहे. याचा फटका रबी पिकांना बसत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ थांबल्यानंतर त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
तथापि, आता वातावरणात अचानक बदल होताना दिसत आहेत. खरे म्हणजे डिसेंबरमध्ये नेहमी कडाक्याची थंडी असते. मात्र, यावेळी ख्रिसमसदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी उष्णता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर पुण्यासह महाराष्ट्रात पुढील ४ दिवस तापमानात घट होईल. पण त्यानंतर पुन्हा कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रबी पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शेतात गहू, हरभरा, ज्वारी अशी हिवाळी पिके आहेत. या पिकांसाठी थंडी पोषक असते. परंतु यंदा थंडी कमी झाल्याने शेतक-याला फटका बसण्याची शक्यता आहे.
सोमवारपर्यंत तापमानात घट
आता ढगाळ हवामान कमी झाल्याने उत्तरेकडच्या वा-यांना गती मिळाल्याने पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात घट होऊ शकते. पुढील ४ दिवस तापमानात २ ते ५ डिग्री अंश कमी होईल. त्यानंतर थंडी वाढू शकते. परंतु पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे.
चार दिवसानंतर तापमान वाढणार
दरम्यान, चार दिवसानंतर पुन्हा तापमानात वाढ होईल. कारण बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. ही माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली. वाढत्या तापमानामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.