21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्ताराअभावी कामे खोळंबली

मंत्रिमंडळ विस्ताराअभावी कामे खोळंबली

एकमत ऑनलाईन

तब्बल २५ दिवस उलटली, नागरिकांतून नाराजी
मुंबई : राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडून आज २५ दिवस पूर्ण होत आहेत. राज्याला फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. पण मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याकडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे. २५ दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक तारखा समोर आल्या. मात्र, अद्याप विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यातील विकासकामांवर आणि जनतेच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे आता नाराजी व्यक्त होत आहे.

२५ दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राज्यातील अनेक विकासकामे आणि शेतक-यांचे प्रश्न अडकलेले पाहायला मिळत आहेत. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर अंतिम निर्णयासाठी मंत्री नसल्याने मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवायलाही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होऊन प्रत्येक विभागाला मंत्री कधी मिळणार, याकडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे.

मागील १५ दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जवळपास ८ लाख हेक्­टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, तर ४ हजार हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. याच बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी २५ दिवसांपासून राज्याला कृषिमंत्री देखील नाही. त्यामुळे विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्री जरी सर्व विभागांचे मुख्य असले किंवा त्यांना प्रत्येक विभागात लक्ष घालण्याचा अधिकार असला तरी रोज होणा-या कामांचा आढावा घेणे मुख्यमंत्र्यांना शक्य नाही. प्रशासनाने तयार केलेल्या फाईलवर प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांना सही करणेही शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने घेतलेले अनेक निर्णय तसेच कागदोपत्री राहण्याची शक्यता असते. त्याचा फटका प्रलंबित कामांना बसत आहे.

मग मंत्रिमंडळाचा
विस्तार का रखडला?
मंत्रिमंडळ विस्तार न होणे हा जनतेचा अपमान आहे. जर सरकारकडे बहुमत आहे तर मग मंत्रिमंडळ विस्तार का रखडला, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. याशिवाय २५ जुलै उजाडल्यानंतरही पावसाळी अधिवेशन अद्याप झाले नसल्याने यावरही पवारांनी टीका करत सरकारला जाब विचारला. मुख्यमंत्री दिल्लीला जातात, पण जनतेचे काय? एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत काम केले, तेच आता कामांना स्थगिती देत आहेत. ते दोघे काय सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत का, असा सवालही पवारांनी उपस्थित केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या