लक्झमबर्गच्या पंतप्रधानांच्या भेटीवरून टीका
मुंबई : आजचा अत्यंत पवित्र दिवस आहे. आज शिवसेनाप्रमुख वाढदिवस आहे. ते आज आपल्यात असते तर ९७ वर्षाचे असते. पण युगपुरुषांना वयाने मोजायचे नसते, तपाने मोजायचे असते. त्यांच्या कार्याने मोजायचे असते. आजच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवस आहे. हे दोन महान सेनापती या देशात निर्माण झाले, असे ठाकरे गटाचे नेते आणि आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिपादन केले.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. यानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संबोधित करताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस भेटीबद्दल बोलताना त्यांची खिल्ली उडवली.
ते म्हणाले की, राज्याच्या राजकारणात खूप गमतीजमती होत असतात. आपले मुख्यमंत्री दावोस नावाच्या देशात गेले होते. तुम्हाला आम्हाला माहित नाही दावोस कुठे आहे, आपल्याला दापोली माहीत आहे. दावोसमध्ये महाराष्ट्रात गुतंवणुकीसाठी एक कार्यालय बनवले होते, तिथे आपले मुख्यमंत्री बसले होते. तिथे अचानक दोन-तीन गोरे लोक आले आणि हे (मुख्यमंत्री शिंदे) गडबडले.. आता त्यांच्याशी बोलायचे काय. मग तिथे कोणीतरी दुभाषिकाने सांगितले, हे लक्झमबर्ग नावाच्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यावेळी लक्झमबर्ग देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, अरे.. तुम्ही इथे? ते म्हणाले.. हो आम्ही इथे. किती खोके देऊन येताय आमच्या पक्षात, त्यांनी असे म्हणताच षण्मुखानंद सभागृहात एकच हशा पिकला. इतकेच बोलून राऊत थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले, सगळेच त्यांच्या पक्षात चालले आहेत, मग लक्झमबर्गचे पंतप्रधानही येणार. मात्र ते म्हणाले नाही..नाही.. मी तर मोदींचा माणूस आहे. मग मुख्यमंत्री म्हणाले की, अच्छा तुम्ही मोदींचे माणूस आहात, आम्हीही मोदींचे माणूस आहोत. मग त्यांनी सेल्फी काढला. यानंतर लक्झमबर्गचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना म्हणाले, हा फोटो मोदींना पाठवा आणि त्यांना सांगा त्यांचा माणूस भेटला होता. ते म्हणाले, हे होऊ शकते, सध्या देशात आणि राज्यात काहीच अशक्य नाही.