26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्र‘ईडी’ला घाबरण्याचे कारण नाही

‘ईडी’ला घाबरण्याचे कारण नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : नांदेडमधील बड्या नेत्यावर ईडीची कारवाई होण्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. पाटील यांचा रोख काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनीही पाटील यांना प्रत्युत्तर दिले. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाटील यांच्या इशा-यावर प्रतिक्रिया दिलीय. जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी हा प्रकार केला जातोय. ईडी विषय आता नेहमीचा झालाय. त्याला घाबरण्याचं कारण नाही, असे नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस याला घाबरणार नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नावर केंद्र सरकारविरोधात लढत राहणार. स्वीस बँकेत काळा पैसा वाढला आहे. हे पैसे भाजपच्या लोकांचे आहेत का? सगळे चोर आणि हे साव अशी भूमिका भाजपवाले घेत आहेत. पण लोक आता त्याला हसत आहेत. अमित शहा यांच्या मुलाचे उत्पन्न एका वर्षात ९ हजार पटींनी वाढले असेल तर मोदींच्या बाजूला बसणा-या अमित शहा यांनाच भीती वाटायला हवी, असा टोला पटोले यांनी लगावलाय.

‘सचिन सावंतांची नाराजी दूर करू’
दुसरीकडे प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर सचिन सावंत नाराज असून त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय. तसेच हायकमांडला आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी त्यांनी केल्याचे कळतेय. याबाबत बोलताना सचिन सावंत यांचे पत्र मला आलेले नाही. याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा करू. त्यांची नाराजी असली तर बसून ती दूर करण्याचा प्रयत्न करू, असे पटोले म्हणाले.

‘केंद्र सरकार चीनचे दलाल आहे का?’
शाहरूख खानचा मुलगा असो वा अमित शहांचा हा प्रश्न गौण आहे. मागील ७ वर्षांत देश ५० वर्षे मागे गेलाय. आज देश धोक्यात आले. चीनचे आक्रमण होत असताना त्याबाबत कोणतेही भाष्य सरकार करत नाही. त्यामुळे हे सरकार चीनचे दलाल आहे का? असा खोचक सवाल पटोले यांनी केलाय.

चंद्रकांतदादांच्या इशा-याला अशोक चव्हाणांचे उत्तर
चंद्रकांत पाटील यांना अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाटलांचे वक्तव्य म्हणजे निवडणूक पाहून खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे. चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? असा सवाल करत लोकशाहीत असे अपेक्षित नसल्याचे चव्हाण म्हणाले.

नांदेडमधील बड्या नेत्यांवर ईडीची किंवा आयकर विभागाची कारवाई होणार आहे का? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाटील यांना केला होता. हा सवाल येताच चंद्रकांतदादा आधी हसले. त्यानंतर त्यांनी पॉझ घेतला आणि आपल्या स्टाईलने उत्तर दिले. मी काही तपास यंत्रणांचा अधिकारी नाही. त्यामुळे मला माहीत नाही. पण माझ्या हसण्यावरून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत नाही, असे सूचक विधान चंद्रकांतदादांनी केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या