33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर ईडीच्या धाडी !

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर ईडीच्या धाडी !

राजकीय सुडापोटी कारवाई केल्याचा आघाडीच्या नेत्यांचा आरोप; सरनाईक यांनी कंगना,अर्णब प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) कंगना रनौत व अर्णब गोस्वामी प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे ठाण्यातील घर,कार्यालय व विविध मालमत्तांवर आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाडी घातल्या. सरनाईक यांचे चिरंजीव पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरांचीही ईडीने झडती घेतली. उद्योगपती राहुल नंदा यांच्या टॉप्स ग्रुपच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडी ने ही कारवाई केल्याचे समजते. दरम्यान राज्यातील सरकार पाडण्यात अपयश आल्याने नैराश्यातून केवळ राजकीय सुडापोटी भाजपाने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून ही कारवाई केल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असून असल्याची जोरदार चर्चा आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपाला लक्ष्य केले होते. या दोघांविरुद्ध विधिमंडळात त्यांनी हक्कभंगही दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आज अंमलबजावणी महासंचनालयाने प्रताप सरनाईक व त्यांच्या कटुंबियांच्या घर व कार्यालयासह १० ठिकाणी एकाच वेळी धाड घालून चौकशी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. परदेशात असलेले प्रताप सरनाईक हे ही मुंबईत परतले असून उद्या त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. राहुल नंदा यांच्या टॉप्स ग्रुपवर सुमारे ३५० कोटी रुपये हवालामार्फत देशाबाहेर नेल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची ईडी चौकशी करत असून तपासात राहुल नंदा व प्रताप सरनाईक यांच्यातील संबंधांची काही माहिती पुढे आल्याने या धाडी घालण्यात आल्याचे समजते. मात्र सरनाईक यांनी यांच्यावर कारवाई करून शिवसेनेवर दबाव आणण्याचा, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. या सरकारला या आठवड्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. हे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल हे अंदाज फोल ठरले आहेत. त्यामुळे भाजपाने आता मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’ सुरू केले असून त्यासाठी दाबावाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आघाडीचे नेते करत आहेत.

राजकारणासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर ! -शरद पवार
शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीका केली. लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका शरद पवार यांनी केली. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आल्याचे दिसते आहे. राज्यात सध्या जे सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही ! -संजय राऊत
प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु असा इशारा देतानाच, ‘आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा, आव्हानही संजय राऊत यांनी दिले. ईडी व अन्य केंद्रीय यंत्रणांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याचंसारखं काम करु नये. ज्यांच्या आदेशावरून ते ईडी काम करतेय त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी देतो, कारवाई करा असे आव्हान त्यांनी दिले. कोणी काहीही केले तरी आघाडी सरकार, आमचे आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. कोणी कितीही दबाव आणला, कितीही दहशत निर्माण केली तरी पुढील २५ वर्ष त्यांचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे,असे संजय राऊत म्हणाले. प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई गेली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये, असा जळजळीत टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

राजकारणासाठी अशा संस्थांचा वापर ! -बाळासाहेब थोरात
प्रताप सरनाईक यांच्या घरात ईडीने शोधमोहीम सुरु केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय संस्थांचा वापर राजकारणासाठीच केला जात असल्याचा आरोप केला. आजवर भाजपशासित राज्यातील नेत्यांवर अशी कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. परंतु भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना त्रास होतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ईडी आणि सीबीआय हे भाजपचे बाहुले !
ईडी आणि सीबीआय हे भाजपचे बाहुले आहेत. या संस्थांचा वापर विरोधकांची तोंड दाबण्यासाठी केला जात आहे,असा आरोप राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. पूर्वी मी भाजपविरोधात बोललो तर माझ्यावर केस टाकली. शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस बजावली. लोकशाहीच्या दृष्टीकोनातून ही दडपशाहीच आहे. आता लोकांनाही माहित झाले आहे की, भाजपविरोधात कुणी बोलले तर त्यांना त्रास देण्यासाठी संस्थांचा वापर होतो. अजूनपर्यंत भाजपच्या एकाही नेत्याला का ईडीची नोटीस गेली नाही,’ असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णव गोस्वामी प्रकरण तसेच कंगनाबाबत सरनाईक यांनी आक्रमक भूमिक घेतली होता. जो भाजप विरोधात आक्रमकपण बोलतो त्याला अनेक मार्गाने त्रास दिला जातो. प्रताप सरनाईकांवर होणार याचा अंदाज मला होता. जसे वाटले तसेच घडले. ईडी आणि सीबीआय हे भाजपचे बाहुले झाले आहेत. या संस्थांना हाताशी घेऊन भाजप सत्तांतराचा कितीही प्रयत्न करू देत महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्ष पूर्ण करणार आणि पुढील निवडणुकीत देखील हेच सरकार स्थापन होणार, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही – फडणवीस
प्रताप सरनाईक त्यांच्यावरील ईडीच्या करवाईवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी मात्र ईडीचे समर्थन केले. ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. आपण दौऱ्यात असल्याने याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल,अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

वायकर,सरनाईक मुखवटे, खरे कलाकार कलानगर मध्ये ! -नितेश राणे यांचा टोला
वायकर, सरनाईक हे केवळ मुखवटे आहेत. मुख्य कलाकार कलानगरमध्ये आहेत, अस्स टोला लगावताना भाजपा नेते नितेश राणे यांनी थेट ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला. यावरून जोरदार टीका केली आहे. मुंबईच्या वायकर आणि ठाण्यातल्या सरनाईक याचं भूयारी गटार कलानगरकडे जाते. ईडीने जरा खोलात जाऊन याचा तपास केला आणि भूयारी गटाराच्या माध्यमातून ते गेले तर ते कलानगरकडे पोहोचतील, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या