25.4 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) राज्यात भाजपाची पाळंमुळं रुजवण्यात महत्वाचे योगदान असलेल्या एकनाथ खडसे यांनी पक्षातील उपेक्षेला कंटाळून अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष सोडल्यामुळे आपल्यामागे ‘ईडी’ लावतील अशी भीती व्यक्त केली जात आहे, पण तसे केले तर मीही ‘सीडी’ बाहेर काढेन. कोणी कुठे भूखंड घेतले तेही मला माहिती आहे,’ असा सूचक इशारा खडसे यांनी यावेळी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे यांचे पक्षात स्वागत करतांना त्यांच्या येण्यामुळे पक्षाची खान्देशातील ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र त्याचवेळी मंत्रिमंडळात सध्या कोणतेही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करताना खडसे यांच्याकडे पक्षातली जबाबदारी सोपवण्याचे संकेत पवार यांनी दिले.

भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्‍थितीत राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी भवनात झालेल्या या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे,छगन भुजबळ यांच्यासह राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, नेते, पदाधिकारी उपस्‍थित होते. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्‍यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर, माजी आमदार गुरुमुख जगवानी यांच्यासह मोजक्या प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्‍ट्रवादीत प्रवेश केला. कोरोनाचे संकट टाकल्यानंतर जळगावात मोठी रॅली घेऊन नाथाभाऊ काय आहे हे दाखवून देऊ, असा निर्धार खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाला अनुपस्थितीत राहिल्याने ते नाराज असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. परंतु अजितदादा कोरोनाच्या लक्षणांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून घरीच विश्रांती घेत असून कोणीही नाराज नसल्याचे स्पष्टीकरण पवार यांनी केले.

खडसेंचा हल्लाबोल व जुन्या सहकाऱ्यांना इशारा !
यावेळी बोलताना खडसे यांनी भाजप नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. ४० वर्षे ज्या पक्षात काम केले, दगड-धोंडे खाऊन ज्या पक्षाची बांधणी केली तो पक्ष सोडावा असं वाटत नव्हते. परंतु तिथल्या लोकांनी कटकारस्थानं केली. बाईला पुढे करून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. आपण आयुष्यभर संघर्ष केला पण समोरून लढलो. कोणाच्या पाठीत वार केला नाही. मात्र भाजपात माझी जी छळवणूक झाली ती सर्वांनी पाहिली. दिल्लीतल्या नेत्यांनाही भेटलो. त्यांनीही
पक्षात तुम्हाला भवितव्य नसल्याचे सांगितले. दिल्लीच्याच काही लोकांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात पक्षातील नेत्यांशी चर्चा करत होतो.

तेव्हा जयंत पाटील मला म्हणाले की,तुम्ही राष्ट्रवादीत येताय पण त्यांनी तुमच्यामागे ईडी लावली तर काय? तेव्हा ‘त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन, असं सांगत खडसे यांनी आपल्याकडे ही असलेली गुपितं उघड करण्याचा इशारा जुन्या सहकाऱ्यांना दिला.भूखंडाची चौकशी माझ्या मागे लावण्यात आली. काही दिवस जाऊद्या कुणी किती भूखंड घेतले आहेत ते मी दाखवून देईन, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. आपण ज्या पक्षावर टीका केली त्या पक्षात कसे काय जाताय असं विचारणाऱ्यांना तुम्ही पहाटे यांच्याबरोबरच शपथ घेतली होती याची आठवणही खडसे यांनी दिली. पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला वाटला होता त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे, असा टोला त्यांनी लगावला.उत्तर महाराष्ट्रात भाजपाची बांधणी केली होती. आता त्यापेक्षा अधिक मेहनत घेऊन राष्ट्रवादी मजबूत करणार असल्याची ग्वाही खडसे यांनी दिली.

कोणालाही मंत्रिमंडळातून वगळणार नाही ! -पवार
राष्‍ट्रवादीत प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना खडसेंना मंत्रीपद देणार व त्‍यासाठी एका विद्यमान मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी जोरदार चर्चा होती. परंतु स्वतः शरद पवार यांनी याचा इन्कार करताना, सध्या आहेत त्‍या मंत्र्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. सगळे आहेत त्‍याच ठिकाणी राहतील असे स्‍पष्‍ट केले. एकनाथ खडसेंनी ज्‍यावेळी आपल्‍यासोबत तसेच पक्षातील इतर नेत्‍यांसोबत पक्षप्रवेशाची चर्चा केली तेव्हा कधीही कोणत्‍याही पदाची त्‍यांनी अपेक्षा केलेली नाही.पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पक्षाच्या विस्तारासाठी आता नाथाभाऊसारखा नेता मिळाला आहे असे सांगताना खडसेंना पक्षात मोठी जबाबदारी देण्याचे संकेत शरद पवार यांनी यावेळी दिले.

जळगाव जिल्‍हा हा मूळचा गांधी-नेहरू या काँग्रेसी विचारांनी चालणारा जिल्‍हा. मात्र नंतरच्या काळात एकनाथ खडसेंच्या रूपाने तिथे नवीन नेतृत्‍व उभे राहिले, त्‍यांनी नव्या पिढीचे कार्यकर्ते घडविले व मूळच्या विचारांना उतरती कळा लागली. पण तेच नाथाभाऊ आता आपल्‍याकडे आले आहेत.त्‍यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेस खान्देशात भक्‍कम करण्याचा शब्‍द दिला आहे.नाथाभाउंनी एकदा शब्‍द दिला की ते तो पाळतातच हा त्‍यांचा लौकिक आहे.त्‍यामुळे आता आपल्‍याला कोणतीही चिंता नाही.नाथाभाऊ काय चीज आहे हे आता सगळयांना दिसेलच असा विश्वास राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्‍त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.त्‍यांना कोरोना नसला तरी थकवा जाणवतो आहे. अजितदादा खडसेंच्या प्रवेशाला उपस्‍थित नसल्‍याने ते नाराज असल्‍याच्या अनेक वावडया उठत होत्‍या. मात्र स्‍वतः शरद पवार यांनीच त्‍यांचे पूर्ण खंडन केले.अजितदादा नाराज कशाला असतील असा सवाल करून शरद पवार म्‍हणाले,गेला काही काळ आपण कोरोनाची परिस्‍थिती बघत आहोत.जितेंद्र आव्हाड,धनंजय मुंडे,बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मंत्री व आपले सहकारी पॉझिटिव्ह झाले होते.आपण लोकांच्या मध्ये राहून काम करणारी माणसे आहोत.त्‍यामुळे खबरदारी घेणे हे अत्‍यावश्यकच असते.यात कोणतीही गडबड नको असे पवार यांनी सांगितले.

हैदराबादच्या प्ले ऑफ च्या आशा पल्लवीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या