37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होण्याची शक्यता

विधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.४ (प्रतिनिधी) नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी केव्हा निवडणूक होणार याबाबत सरकारकडून कोणतेही उत्तर दिले जात नसले तरी पुढच्या आठवड्यात अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निवडणूक घेण्याची चाचपणी सुरू आहे. सोमवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

नाना पटोले यांच्याकडे कॉग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त असून उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी आहे. अध्यक्षपदासाठी कधी निवडणूक घेतली जाणार याबाबत सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला पत्र पाठवून लवकरात लवकर अध्यक्षांची निवड करण्याची सूचना केली होती. परंतु विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय न घेणाऱ्या राज्यपालांना रिक्त अध्यक्षपदाची एवढी चिंता करण्याचे कारण नसल्याचे सुनावत सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे या अधिवेशनात निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रम होता. परंतु सरकारने पुढच्या आठवड्यात निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

कोरोनाच्या संसर्गामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, जयंत पाटील, राजेंद्र शिंगणे या मंत्र्यांसह काही आमदार अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात उपस्थित राहू शकले नाहीत. पुढच्या आठवड्याच्या कामकाजापूर्वी सर्व आमदारांना पुन्हा कोविड चाचणी करून घ्यावी लागणार आहे. ही चाचणी झाल्यानंतर पुढील आठवड्यात आपले सर्व सदस्य उपस्थित राहू शकतील की नाही याचा अंदाज सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांना येईल. त्यानुसार सोमवारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्याचा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत निर्णय होऊन याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करून आवश्यकता भासल्यास बुधवारी १० मार्च रोजी मतदान होऊ शकेल, असे एका वरिष्ठ नेत्याने सूचित केले.

दुचाकी चोरांची टोळी गजाआड ; ३३ दुचाकी जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या