33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र शेतकऱ्यांचा मुंबईत एल्गार, राज्यपाल गोव्याला निघून गेल्याने आंदोलक प्रक्षुब्ध, निवेदन फाडले !

शेतकऱ्यांचा मुंबईत एल्गार, राज्यपाल गोव्याला निघून गेल्याने आंदोलक प्रक्षुब्ध, निवेदन फाडले !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२५ (प्रतिनिधी) शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीला सुरु असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी आज मुंबईत विराट शक्तिप्रदर्शन केले. आझाद मैदानावरून राजभवनाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी मेट्रो सिनेमा चौकात अडवला. शेतकरी व आंदोलनात सहभागी झालेल्या पक्षाचे नेते राजभवनावर जाऊन राज्यपालांन निवेदन देणार होते. पण राज्यपाल गोव्याला निघून गेल्याने संतप्त शिष्टमंडळाने राज्यपालांचा कृतीचा निषेध करून निवेदन फाडून टाकले. राज्यपाल कोश्यारी यांना कंगना रनौतला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांना भेटण्यासाठी सवड नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली.

तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज डाव्या पक्षांच्या किसान महासभेने मुंबईतील राजभवनावर मोर्चा काढला. या आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह भाजपा व्यतिरिक्त सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. राज्यभरातून आलेले शेतकरी छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस समोरील आझाद मैदानावर जमा झाले. तेथे सर्वपक्षीय सभा झाली. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शेकाप नेते जयंत पाटील, कॉ. अशोक ढवळे, कॉ. अजित नवले यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. सभेनंतर आझाद मैदानावरून मोर्चा निघाला, हा मोर्चा मेट्रो सिनेमा चौकात अडवण्यात आला. यानंतर २३ जणांचे शिष्टमंडळ राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन देणार होते. ठरल्याप्रमाणे शिष्टमंडळ तिकडे जायला निघालेही होते. पण राज्यपाल गोव्याला गेले असून त्यांचे सचिव निवेदन स्वीकारणार असल्याचे समजल्याने आंदोलक संतप्त झाले.राज्यपालांशी भेट झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पण नंतर शिष्टमंडळाने राजभवनावर न जाण्याचा निर्णय घेतला. व्यासपीठावर येऊन राज्यपालांना देण्यासाठी तयार करण्यात आलेले निवेदन फडण्यात आले.

राज्यपालांकडून महाराष्ट्रातील जनतेचा अपमान !
राज्यपाल स्वतः निवेदन स्वीकारण्यास उपस्थित न राहिल्याबद्दल कॉ. अशोक ढवळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी स्वत: वेळ दिली होती. पण ते पळून गेले. राज्यपालांची ही कृती महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. श्रमिक, कष्टकरी, कामगारांचा हा अवमान राज्यपालांनी केला आहे. राज्यपाल भाजपचे पुढारी होते. ते आरएसएसचे प्रचारक अजूनही आहेत, त्यामुळं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, अशी टीका ढवळे यांनी केली. राज्यपालांच्या या कृतीला निषेध म्हणून हे निवेदन आम्ही फाडत आहोत. आता हे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येईल. आज एकजुटीनं आणि ताकतीनं आपण मोर्चा काढला. उद्या प्रजासत्ताक दिन आहे. हा आपला दिवस आहे. आजचा मोर्चा केंद्र सरकारच्या विरोधातला मोर्चा आहे. यापुढे अंबानी, अदानीची उत्पादनं वापरु नका. शांततेत आपण आझाद मैदानात जायचं आहे. उद्या २६ जानेवारीला तिरंग्याला वंदन करुन आंदोलकांनी शांततेने घरी परतावे,असे आवाहन ढवळे यांनी केले.

कंगनाला भेटायला वेळ आहे, शेतकऱ्यांना नाही !
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जो शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करतो, त्याला समाजकारणातून उध्वस्त करण्याची ताकद आमच्यात आहे हे आज शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं, अशी टीका शरद पवार यांनी केली.

शेतकरी आंदोलक पंजाब व हरियाणाचे असल्याचं सरकारकडून सांगितलं जात होते.. पंजाबचा शेतकरी असला म्हणून काय झालं? पंजाब पाकिस्तानात आहे का ? असा सवाल पवार यांनी केला. चर्चा न करता कायदा आणले गेले. संसदेत जेव्हा कायदा आणला तेव्हा एका दिवसात एका अधिवेशनात एकदम तीन कायदे मान्य झाले. कायदा आणताना सविस्तर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल व शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. ६० दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कधी त्यांची चौकशी केली का? असा सवाल अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

राजभवनाकडून स्पष्टीकरण !
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेट न देता गोव्याला निघून गेल्याबद्दल टीकेची झोड उठल्यानंतर राजभवनाकडून याबाबत स्पष्टीकरण करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिर‍िक्त कार्यभार आहे. २५ जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोध‍ित करणार असल्याने त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राजभवनातून आधीच स्पष्ट करण्यात आल्याचे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले. संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना २२ जानेवारी रोजी दुरध्वनीव्दारे तसेच निमंत्रक प्रकाश रेडडी यांना २४ जानेवारी रोजी लेखी पत्राव्दारे राज्यपालांच्या अनुपलब्धते बद्दल कळविण्यात आले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे चुकीचे आहे असे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले आहे. धनंजय शिंदे यांनी राजभवनातून राज्यपाल भेटणार नसल्याचा मेसेज काल आला होता. पण राज्यभरातील शेतकरी मुंबईत येणार असल्याबाबत मागील पंधरा दिवसांपासून याबाबतच्या बातम्या माध्यमांमधून येत होत्या इतकी माहिती असताना देखील राज्यपालांना मोर्चेकऱ्यांनी भेटणं टाळलं आहे. मागील तीन दिवसांपासून थंडीत चालत आलेल्या मोर्चेकऱ्यांना राज्यपालांनी भेटणं आवश्यक होतं. परंतु त्यांनी जाणूनबुजून मोर्चेकऱ्यांना भेटणे टाळल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या