पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडकपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. आरोग्याची काळजी घेण्याबाबत देखील ते नेहमीच सल्ले देत असतात. मास्क वापरण्याबाबत नेहमीच आग्रही असणा-या अजित दादांनी आता व्यायाम कसा करावा याचा सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले की, मैदानी खेळांनी शरीर चांगलं राहतं.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे व्यायाम करता आला नाही. कसाही व्यायाम करून चालत नाही, अति व्यायामदेखील वर घेऊन जातो. त्यामुळे ट्रेनरच्या मदतीने व्यायाम करा. त्यांनी म्हटले की, अगोदर लोक म्हणायचे सकाळी लवकर लोक येत नाहीत. पण सवय लावेल तसे लोक वागतात, चांगली सवय लावू, निर्व्यसनी राहू, असा सल्लाही त्यांनी दिला.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर बोलताना ते म्हणाले की, आता परत कोरोना वाढतोय. इथे पण बघा बसलेल्या भगिनींनी मास्क घातला आहे. स्टेजवर फक्त एक जणाने मास्क घातला आहे बाकी कोणीच घातला नाही, सगळे सांगतात मास्क घाला, मुख्यमंत्री म्हणतात, मी म्हणतोय,परत कोरोना येतोय,अजून कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही. कोरोनाची टेस्टिंग कमी आहे. सर्वांनी लस घ्यावी, बूस्टर डोस घ्यावा. राज ठाकरे, सोनिया गांधी यांना कोरोना झाला आहे. राज ठाकरे यांचे ऑपरेशन होते त्यावेळी त्यांना कळले. कोरोना गेला नाही काळजी घ्यायला हवी, असे अजित पवार म्हणाले.
रस्त्यावर कचरा टाकण्यावरून बोलताना अजित पवार म्हणाले की, पुणेकर, मुंढवाकर रस्त्यावर कचरा कशाला टाकता. स्वत:चं घर साफ अन् बाहेर कचरा. यावर कठोर भूमिका घ्यायला लावू नका. कारण कच-यामुळे घाण होते अन् रोगराई वाढते असे ते म्हणाले.
कै. चंचलाताई कोद्रे जिम्नॅशियमचे उद्घाटन
यावेळी अजित पवारांच्या हस्ते कै. चंचलाताई कोद्रे जिम्नॅशियमचे उद्घाटन झाले. अजित पवार म्हणाले की, दुर्दैवाने चंचला आपल्यातून निघून गेली अन् आपल्याला तिच्या नावाने हे उभं करावं लागलं. पोटतिडकीने काम करायची, अशा शब्दांत त्यांच्या कामाच्या आठवणी अजित पवारांनी सांगितल्या. अजित पवार म्हणाले की, महापालिका मुदत संपली आहे. निवडणुका पुढे गेल्या आहेत. आता ओबीसी प्रश्न आहे पण ओबीसी घटकांना त्यांच्या त्यांच्या परीने त्यांना हक्क मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ५० टक्के पुढे न जाता कोर्टाचे पालन करून मध्य प्रदेशच्या धर्तीवर करण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
एक सायन्स पार्क करायचे आहे
अजित पवारांनी सांगितले की, केंद्र-राज्य सरकार यांची एक योजना माझ्या मनात आहे. एक सायन्स पार्क करायचे होते, पण जागा हवी होती. पिंपरी-चिंचवडमध्ये ५ एकर जागा होती पण त्याला अडचण होती. ते अजून पण डोक्यात आहे सायन्स पार्क करायचं असे ते म्हणाले.