24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रएसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ

एकमत ऑनलाईन

३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत, सणासुदीच्या काळात गैरसोय होऊ नये म्हणून ज्येष्ठांना संधी
मुंबई : एसटीच्या प्रवासात विविध घटकांतील सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांच्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने स्मार्ट कार्ड योजनेला नोंदणीकरण व वितरणासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना २५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यात सवलत दिली जात आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारात ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग तसेच एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्डासाठी नोंदणी करणे किंवा स्मार्टकार्ड घेणे शक्य झाले नाही. जुलैमध्ये आषाढी एकादशीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांच्या मागणीनुसार या योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या दरम्यानही स्मार्ट कार्डसाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून स्मार्ट कार्डसाठी आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

मुदतवाढीचा होता आग्रह
पुढील आठवड्यात ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान असलेला गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीतही ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड नोंदणीकरण व वितरण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

२५ ते १०० टक्के सवलत
राज्य सरकार विविध प्रकारच्या सवलती देण्याच्या २९ योजना राबवत आहे, तर विविध सामाजिक घटकांना सुमारे २५ ते १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यात सवलती दिल्या जातात. या सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना आधार कार्ड क्रमांकाची निगडित असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटी महामंडळाने सुरु केली होती. एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारांत ज्येष्ठ नागरिकांसाठी व अन्य म्हणजेच इतर सवलतीधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या