मुंबई, 05 जून : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मुंबई हे कोरोनाचं केंद्र झालं आहे. देशात सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आहेत. या सगळ्यात मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला. एका 35 वर्षीय तरुणाला 65 वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाची परवानगीशिवाय कोव्हिड-19 टेस्ट करून बनावट रिपोर्ट दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल गफ्फर शेख असे या अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो वडाळा येथील रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. 10 दिवसांपूर्वीच त्याला येखे नोकरी मिळाली होती. त्याच्याकडे संशयित रुग्णांच्या स्वॅब टेस्ट करण्याचीही जबाबदारी होती.
मेहर लांबेराजनं अब्दुल गफ्फर शेखविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेहर यांच्या आईला कॅन्सर असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करायचे होते. मात्र कोव्हिड-19 टेस्ट न केल्यामुळं त्यांना कोणत्याही रुग्णालयात अॅडमिट केलं जात नव्हतं. त्यामुळं मेहर यांनी शेख यांच्याशी संपर्क करत आईची कोव्हिड-19 चाचणी करण्याचा निर्णय घेतला. शेखनं मेहर यांच्या घरी येऊन त्यांच्या आईची स्वॅब टेस्ट केली आणि 6 हजार रुपयेही घेतलं. मात्र शेखनं कोरोना रिपोर्ट आणून दिलं नाही. मेहर यांनी शेखशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
Read More मुसळधार पावसात मोठा अपघात : 9 जणांचा जागीच मृत्यू
अखेर शेखनं मेहर यांच्या आईचे रिपोर्ट त्यांच्या काकांकडे सुपर्द केले. मात्र त्या रिपोर्टमध्ये पूर्ण माहिती नसल्याचे मेहर यांना आढळून आलं.मेहर यांना शंका आल्यानं त्यांनी लॅबमध्ये चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की, त्यांच्या आईच्या स्वॅब टेस्टचे नमुने लॅबमध्ये पोहचलेच नाही. त्यानंतर मेहर यांनी ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या प्रकरणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शेख यांच्या फोन डेटाच्या आधारे पोलिसांनी शेखला अटक केली. अटक केल्यानंतर शेखनं गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी शेखची चौकशी केल्यानंतर पैशांसाठी त्यानं असं केल्याचं समोर आलं. शेखनं पोलिसांना सांगितलं की, पगार जास्त मिळत नसल्यानं दोन वेळचं अन्नही मिळत नव्हतं. पैशांसाठी हा असा प्रकार केल्यानं त्यानं कबुल केलं. दरम्यान सध्या पोलीस शेखनं आणखी कोणाचे असे बनावट रिपोर्ट केले आहेत का, याची चौकशी करत आहेत.